
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
गोंदिया : जिल्ह्यात सध्या तापमान कमी असले तरी उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे. रोजगार हमी योजनेची कामे आणि विटाभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांना उष्माघाताचा धोका लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने कामाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. यासोबतच, आरोग्य प्रशासनानेही तातडीने दखल घेत रोजगार हमी कामांवरील मजुरांना आरोग्य सेवा पुरवण्याचे निर्देश सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिले आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी गावपातळीवरील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील रोजगार हमीची कामे आणि विटाभट्ट्यांच्या ठिकाणी भेटी देऊन मजुरांना प्राथमिक उपचार आणि आवश्यक औषधे देण्याचे तसेच गरज वाटल्यास त्यांना योग्य ठिकाणी संदर्भित करण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी अति उष्णतेमुळे काम करताना उष्माघाताची लक्षणे आढळल्यास रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील शीतगृहात दाखल करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली उपचार करण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाने सर्व रोजगार हमी कामांच्या ठिकाणी त्यांच्या प्रमुखांना प्राथमिक औषधोपचार किट उपलब्ध ठेवण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविका घरोघरी भेटी देऊन मजुरांना ओआरएस पाकिटे आणि ताप तसेच पोटदुखीवरील प्राथमिक औषधे देत आहेत, तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आरोग्य शिक्षणही देत आहेत.
जिल्ह्यात साथरोग नियंत्रण पथक कार्यरत असून, आरोग्य संस्थांमार्फत दररोज बाह्यरुग्ण सेवेत उष्माघाताची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची माहिती आयडीएसपी पोर्टलवर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी सांगितले. २९ एप्रिल रोजी जिल्हा साथरोग पथकाने जिल्ह्यातील रोजगार हमीची कामे, विटाभट्ट्या आणि बांधकाम साईटला भेटी देऊन मजुरांची तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार ओआरएस पाकिटांचे वाटप करून उष्माघात प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण दिले.
डॉ. अग्रवाल यांनी उष्माघात ही एक वैद्यकीय आणीबाणी असून, त्याची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित १०८ किंवा १०२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
उष्माघाताची प्रमुख लक्षणे : शरीराचे तापमान वाढणे, श्वास लागणे आणि हृदयाचे ठोके वाढणे, लघवी कमी होणे, अत्यधिक तहान लागणे, मळमळ वाटणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, भ्रमित होणे किंवा घाम येणे बंद होणे आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे : भूक न लागणे, अत्यधिक चिडचिड, लघवी न होणे, तोंडात लाळ तयार न होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, सुस्ती/मानसिक भ्रम आणि झटका येणे किंवा कोणत्याही ठिकाणाहून रक्त वाहणे अशी असू शकतात.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये उष्माघाताची लक्षणे : मानसिक संवेदनशीलता कमी होणे, दिशाहीनता, भ्रम, गोंधळ, चिडचिड, झटका किंवा कोमात जाणे, त्वचा गरम, लाल आणि कोरडी पडणे, शरीराचे तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक असणे, तीव्र डोकेदुखी, चिंता, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि अशक्तपणा जाणवणे, स्नायू कमकुवत होणे किंवा पेटके येणे, मळमळ आणि उलटी होणे, हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे आणि श्वास लागणे यांचा समावेश होतो.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी साधे उपाय : भरपूर पाणी आणि ज्यूस प्या, पातळ आणि सैल सुती कपडे घाला, कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, अनवाणी चालू नका, थेट सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळण्यासाठी टोपी/टॉवेल/छत्रीचा वापर करा, दुपारच्या वेळी अधिक शारीरिक श्रम टाळा, घर थंड ठेवा, पंखे आणि ओल्या कपड्यांचा वापर करा, स्वयंपाक करताना हवा खेळती ठेवा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या गाडीत सोडू नका, कडक उन्हात स्वयंपाक करणे टाळा आणि दारू, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड शीतपेये टाळा. अधिक प्रथिनेयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळा आणि हवामानाची अद्ययावत माहिती घेत राहा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.



