
काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी स्वखर्चातून खोदून दिल्या तीन बोअरवेल
सिरोंचा : तालुक्यातील जाफ्राबाद ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक दोनमधील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी त्वरित उपाययोजना केली आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक खर्चातून तीन नवीन बोअरवेल खोदून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवली आहे.
या बोअरवेलचे उद्घाटन नुकतेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. काँग्रेस नेते अजय कंकडालवार हे सिरोंचा आणि जाफ्राबादच्या दौऱ्यावर असताना वार्ड क्रमांक दोनमधील नागरिकांनी त्यांच्यासमोर पिण्याच्या पाण्याची गैरसोय मांडली होती. या भागातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांनी कंकडालवार यांना या अडचणीची माहिती दिली होती. त्यावेळी कंकडालवार यांनी लवकरात लवकर गावातील पाणीपुरवठा आणि इतर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.
आपले आश्वासन पूर्ण करत अजय कंकडालवार यांनी जाफ्राबाद वार्ड क्रमांक दोनमध्ये तीन नवीन बोअरवेल खोदल्या, ज्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या आता दूर झाली आहे. या कार्याबद्दल नागरिकांनी अजय कंकडालवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
उद्घाटनप्रसंगी जाफ्राबाद ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दुर्गम, मदन कोंडागुर्ला, नारायण दुर्गम, राकेश जाडी, ओलाय्या करसपाल्ली, समय्या कोंडागुर्ला, संतोष करसपाल्ली यांच्यासह गावातील अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंकडालवार यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



