गोंदियाविदर्भ

नगर परिषदेत तंबाखू विरोधी धाडसत्र ; 11 कर्मचाऱ्यांकडून 1600 रुपयांचा दंड वसूल

गोंदिया : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी नगर परिषद कार्यालयात तंबाखू विरोधी धाडसत्र राबविण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या विविध विभागांमध्ये धाड टाकण्यात आली. या कारवाईत ११ कर्मचाऱ्यांकडून तंबाखू व गुटखा बाळगल्याबद्दल तसेच सेवन केल्याबद्दल तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा २००३ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण १६००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तंबाखू नकार दिनानिमित्त (१ मे ते १५ जून) सुरू असलेल्या ४५ दिवसांच्या विशेष अभियानाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान, धूम्रपान निषिद्ध क्षेत्राबाबत जनजागृती करण्यात आली तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांचे पोस्टर्स वितरित करण्यात आले.

जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे आणि त्यांचे सेवन करणे कायद्याने निषिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत. त्यानुसार, गोंदिया नगर परिषदेत ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कांबळे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, जिल्हा सल्लागार डॉ. ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या संध्या शंभरकर, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे आणि पोलीस विभागाचे लक्ष्मीचंद आदमने व सरिता पटले यांनी संयुक्तपणे पार पाडली.

हे विशेष धाडसत्र तंबाखू नकार दिनानिमित्त १ मे ते १५ जून या ४५ दिवसांच्या अभियानाचा एक भाग आहे. या कारवाईमुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखू सेवनाबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button