क्राईमनागपूरमुख्य बातमीविदर्भ

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश ; मध्य प्रदेश पोलिसांकडून नागपूरच्या दोन आरोपींना अटक

४० लाखांच्या बनावट नोटा जप्त

सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवत होते गोरखधंदा ; पाचपट बनावट नोटांचे आमिष दाखवून फसवणूक

नागपूर : मध्य प्रदेश पोलिसांनी एका मोठ्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, यात नागपुरातील दोघा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. हे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच कालावधीपासून सक्रिय होते.

दीपक पाटील आणि राजू, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही नागपूरचे रहिवासी असून, ते खऱ्या पैशांच्या बदल्यात पाचपट बनावट नोटा देण्याचे रॅकेट चालवत होते. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असत. ते एक लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात ४ ते ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा देत असत. या बनावट नोटा थोड्या खराब असल्याने सरकारकडूनच त्या कमी दरात मिळत असल्याची बतावणी ते लोकांना करायचे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्याकडील सर्व बनावट नोटांची छपाई अगदी खऱ्या नोटांसारखीच होती. नोटा मोजण्याची मशीन आणि सेन्सरदेखील त्यातील बनावटपणा ओळखू शकत नव्हते. आरोपी केवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटांचेच डील करत होते.

इंदूर येथील पलासिया पोलीस ठाण्यातील पथकाला या रॅकेटची गुप्त माहिती मिळाली. दोन्ही आरोपी इंदूरमधील एका भाड्याच्या घरातून हा गोरखधंदा चालवत होते. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून ५०० रुपयांच्या एकूण ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यासोबतच पोलिसांनी त्यांच्याकडून नोटा मोजण्याची मशीन, मोबाईल आणि काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. पलासिया पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर सेलच्या मदतीने पोलीस आरोपींच्या सोशल मीडिया नेटवर्क आणि बँक खात्यांचाही कसून तपास करत आहेत.

आरोपी सोशल मीडियावर लोकांना संपर्क साधायचे आणि नोटा काहीशा खराब असल्याने त्या कमी किमतीत मिळत असल्याचे आमिष दाखवायचे. ते नोटांचे बंडल तयार करायचे आणि वरच्या बाजूला केवळ खऱ्या नोटा ठेवायचे, तर खाली बनावट नोटा असत. या रॅकेटचा पोलीस कसून तपास करत असून, आरोपींसोबत आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, अगदी खऱ्या नोटांप्रमाणे नोटा छापण्याचे तंत्रज्ञान आरोपींकडे कुठून आले, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात आरोपी बऱ्याच काळापासून या बेकायदेशीर धंद्यात सहभागी असून, मध्य प्रदेशासह अनेक राज्यांतील लोकांशी त्यांचे संपर्क असल्याचे उघड झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button