
सीमावर्ती भागातून परतणाऱ्या मजुरांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घ्यावी – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण
गोंदिया : जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्याला लागून असल्याने, दरवर्षी जिल्ह्यातील अनेक मजूर तेंदूपत्ता, पत्ता तोडणी, बांबू कटाई, बांधकाम आणि रस्ते कामांसारख्या विविध कामांसाठी स्थलांतर करतात. कामाच्या ठिकाणी आरोग्याची पुरेशी काळजी न घेतल्याने आणि उघड्यावर झोपल्याने त्यांना आजारी पडण्याची किंवा हिवतापाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
गोंदियाच्या सीमावर्ती भागात जंगलव्याप्त प्रदेश असल्याने, काम आटोपून परत येत असताना अनेक मजूर आजारी किंवा हिवतापाचा संसर्ग घेऊन येण्याची शक्यता असते. त्यामुळे, स्थलांतरित मजुरांनी पत्ता तोडणी किंवा इतर कामांसाठी बाहेरगावी जात असल्यास, तसेच परत आल्यानंतर ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे जाणवल्यास, प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी केले आहे.
गावपातळीवर आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांच्याकडे हिवताप चाचणीसाठी आरडीके (जलद ताप सर्वेक्षण किट) उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही तापाला कमी लेखू नका आणि त्वरित रक्ताची तपासणी करून घ्या, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनीही स्थलांतरित मजुरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, हिवतापासारखी लक्षणे, जसे की ताप, सर्दी, अंगदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, हगवण आणि अतिसार इत्यादी दिसल्यास कोणत्याही भोंदूबाबा किंवा अप्रशिक्षित डॉक्टरांना न दाखवता, त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करावी. आरोग्य विभागाने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आणि वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.



