क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोलीत बनावट दारू कारखान्यावर छापा, लाखोंचा मुद्देमाल जप्त ; चौघे ताब्यात

गडचिरोली : पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अवैध दारू विक्री व निर्मितीवर अंकुश ठेवण्याच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी दक्षिण गडचिरोलीतील ताडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुडकेली जंगल परिसरात सुरू असलेल्या एका बनावट देशी दारू कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे ३९.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

कुडकेली जंगल परिसरात दोन दिवसांपूर्वीच बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू झाल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, सपोनि. राहुल आव्हाड, सपोनि. भगतसिंग दुलत यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक आणि विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान घटनास्थळी रवाना झाले.

पोलिसांची चाहूल लागताच, घटनास्थळावरून एक चारचाकी वाहन अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेऊन ताडगाव ते आलापल्ली रोडच्या दिशेने वेगाने पळण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी पाठलाग केला असता, वाहन चालकाने कारखान्यापासून २०० मीटर अंतरावर वाहन उभे करून जंगलात पळ काढला. वाहनाची तपासणी केली असता, त्यात देशी दारूचे बॉक्स आढळून आले. विजेची सोय नसल्यामुळे, पोलिसांनी रात्रभर वाहन आणि कारखाना परिसर सुरक्षित ठेवला.

गुरुवारी सकाळी ७ वाजता पंचांसमक्ष छापा कारवाई करण्यात आली असता, लाखो रुपयांची बनावट दारू आणि ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. १५ प्लास्टिक ड्रममधील ४५०० लीटर स्पिरिट (किंमत १३.६५ लाख रुपये), १००० लीटर क्षमतेचे २ व ७५० लीटर क्षमतेचे १ बनावटी देशी दारूने भरलेले ड्रम (किंमत ८.२५ लाख रुपये), १० एम.एल. मापाच्या ८७०० बनावटी देशी दारूच्या बाटल्या (किंमत ६.९६ लाख रुपये), एक पांढऱ्या रंगाची होंडा ब्रिओ चारचाकी वाहन (एमएच ४६ ए. यू. २२६०) (किंमत ४ लाख रुपये), एक ग्रे रंगाची होंडा शाईन मोटार सायकल (एमएच ३४ बीपी ६४३०) (किंमत ६०,००० रुपये), किसान पॉवर गोल्ड कंपनीचे ७.५ एच.पी. जनरेटर (किंमत १ लाख रुपये), देशी दारूच्या बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ५ सीलिंग मशीन (किंमत २.५० लाख रुपये) आणि इतर वायर, रॉकेट देशी दारू प्रवरा डिस्टीलरी प्रवरा नगर असे लिहिलेले कागदी प्रिंटेड लेबल, जेट पंप, पाईप, ट्रे, प्लास्टिक कॅन, रासायनिक द्रव्ये, खोके, बॅटरी, इन्व्हर्टर, बाटलीचे झाकण, रिकाम्या बाटल्या, ताडपत्री, गॅस शेगडी, गॅस सिलेंडर इत्यादी साहित्य (किंमत २.३५ लाख रुपये) असा एकूण ३९,३१,१००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी, १) वसंत प्रदान पावरा (१९, रा. बोराडी, ता. शिरपूर, जि. धुळे), २) शिवदास अमरसिंग पावरा (३५, रा. धाबापाडा, ता. शिरपूर, जि. धुळे), ३) अर्जुन तोयाराम अहिरे (३३, रा. ता. जि. धुळे), ४) रविंद्र नारायण पावरा (१८, रा. सलाईपाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, ताडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. भगतसिंग दुलत, स्था.गु.शा. गडचिरोली हे करत आहेत.

सदर कारवाई पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, सपोनि. राहुल आव्हाड, सपोनि. भगतसिंग दुलत, विशेष अभियान पथक प्राणहिताचे पोउपनि. विजय सपकाळ, स्था.गु.शा.चे पोहवा/सुधाकर दंडीकेवार, अकबरशहा पोयाम, पोअं/शिवप्रसाद करमे, राजू पंचफुलीवार, चापोअं/निकेश कोडापे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button