
राष्ट्रीय सुरक्षा व शांतता धोक्यात येण्याची शक्यता ; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
गोंदिया : जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र (Unmanned Aerial Vehicles- UAV) यांचा वापर काही असामाजिक तत्वांकडून होण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सार्वजनिक शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. या कारणास्तव अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर, गोंदिया जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, १६ मे २०२५ ते ०३ जून २०२५ पर्यंत गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर कोणत्याही मानवरहित हवाई यंत्र चालवण्यास, उडवण्यास किंवा वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी बेहेरे यांनी स्पष्ट केले आहे की, जर कोणतीही व्यक्ती या आदेशाचे उल्लंघन करेल, तर तिच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी (ex parte) पद्धतीने लागू करण्यात येत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



