
गडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांवर आवाज उठवत काँग्रेस पक्षाने गुरुवारी पत्रकार परिषद आयोजित केली. खासदार डॉ. नामदेव किरसान आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत रानटी हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. यासोबतच नुकसान भरपाईत वाढ करावी आणि घरकुल लाभार्थ्यांना मान्सूनपूर्व रेतीचा एक हप्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी बोलताना खासदार डॉ. किरसान म्हणाले की, जिल्ह्यात रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पीक आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु शासनाकडून अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी शेतकऱ्यांना धान बोनस आणि कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, गडचिरोली येथे प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित न करता इतर शासकीय जमिनीचा वापर करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हाध्यक्ष ब्राम्हणवाडे यांनी इशारा दिला की, जर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आगामी काळात काँग्रेस पक्ष तालुकास्तरावर मोठे आंदोलन उभे करेल.
या पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणखी काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या, त्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्यास शासनाने जागा उपलब्ध करून देऊन त्यांना प्रॉपर्टी कार्डसह घरकुल योजनेचा लाभ द्यावा. कंत्राटदारांची थकीत देयके त्वरित देण्यात यावी. सुरजागड लॉयड मेटल्स कंपनीने आतापर्यंत किती स्थानिक युवकांना रोजगार दिला याची माहिती द्यावी आणि स्थानिकांना प्राधान्याने नोकरी द्यावी. वृद्ध कलावंत मानधन योजनेतील थकीत मानधन त्वरित देण्यात यावे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतील ४४० लाभार्थ्यांचा निधी तातडीने द्यावा. बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर योजना तसेच मागेल त्याला विहीर रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे अनुदान त्वरित द्यावे. शासकीय धान खरेदी केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने धानाचे चुकारे द्यावे. शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप अनिवार्य न करता त्यांना विद्युत कृषी पंपाचा पर्याय द्यावा. कुरखेडा, कोरची, वडसा येथील शेतीसाठी देण्यात येणाऱ्या विजेचा व्होल्टेज वाढवावा आणि सध्या सुरू असलेल्या लोड शेडिंगच्या वेळेचे योग्य नियोजन करावे. भेंडाळा त. चामोर्शी परिसरातील MIDC साठी प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापन करण्याकरिता शासनाने अवलंबलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहित करू नये. रोजगार हमी योजना, घरकुल सारख्या विविध योजनांतील थकीत अनुदान लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावे. सुरजागड येथे चालणाऱ्या जड वाहतुकीमुळे अपघात आणि प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी उपाय करावे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची तातडीने दुरुस्ती करावी. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील रिक्त पदांची तातडीने भरती करावी. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यातून किमान दोन दिवस जिल्ह्यासाठी देऊन येथील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात. इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चने, महासचिव घनशाम वाढई, जितेंद्र मुनघाटे, हरबाजी मोरे, प्रभाकर वासेकर, रमेश चौधरी, रविंद्र चापले, पुरुषोत्तम चिंचोलकर, भय्याजी मुद्दमवार, विपुल येलटीवार, स्वप्नील ताडाम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.



