आरोग्यगोंदियाविदर्भ

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती ; प्रतिबंधात्मक उपायांवर भर

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि हिवताप विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. जिल्हास्तरीय या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास विंचुरकर यांच्यासह आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणाऱ्या विविध पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे म्हणाले, “डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे आणि हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्तटाय नावाच्या डासांमुळे होतो, ज्यांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे नागरिकांनी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये.” त्यांनी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा सेविकांनी गावपातळीवर याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सहभागावर जोर देण्याचे आवाहन त्यांनी केले. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासांच्या अळ्या नष्ट करणे महत्त्वाचे असून, यासाठी इतर विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सवयी बदलण्यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी केवळ मोहिम काळातच नव्हे, तर नेहमीच आपल्या परिसराची स्वच्छता राखण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी घरातील पाणी साठ्यांवर झाकण ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, मच्छरदाणीचा वापर करणे, खिडक्यांना जाळ्या बसवणे, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी लावणे, भंगार आणि निरुपयोगी टायरची योग्य विल्हेवाट लावणे, कूलर आणि फ्रिजच्या ड्रीपपॅनमधील पाणी नियमितपणे स्वच्छ करणे, पाण्याची टाकी आणि हौद आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे, गटारे वाहती ठेवणे, साचलेल्या पाण्यात रॉकेल किंवा जळालेले तेल टाकणे, कुंड्यांमधील पाणी बदलणे आणि डास पळवणारी साधने वापरण्याचे आवाहन केले. झोपताना पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे आणि मच्छरदाणीचा नियमित वापर करणे हेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. लहान वयातच विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशिष बल्ले यांनी केले. याप्रसंगी हिवताप विभागाचे किशोर भालेराव, अनिल चोरवाडे, वर्षा भावे, आशिष बले, आरोग्य पर्यवेक्षक ठाकरे, कमल डोंगरे, पंकज गजभिये यांच्यासह जिल्ह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्य व हिवताप विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button