
गडचिरोलीत समाजाच्या प्रगतीसाठी पंचसूत्रीवर भर ; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नई दिल्लीच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने स्थानिक शासकीय विश्राम भवनात जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा उपस्थितांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. होळी यांनी सांगितले की, समाजहितासाठी काम करताना सामाजिक भान जपणे आणि समाजाच्या विकासासाठी कार्य करणे आवश्यक आहे. त्यांनी जिल्ह्यातील ४५ जमातीतील लोकांना एकत्र आणण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक संघ होऊन कठोर परिश्रम घेण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
डॉ. होळी पुढे म्हणाले की, समाजाच्या उत्थानासाठी सामाजिक प्रबोधन होणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे. यासाठी विविध विषयातील तज्ञ लेखक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
आपल्या चिरंतन संस्कृतीतील विस्मरण झालेल्या गोष्टी, संस्कार आणि व्यवहारांना पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी पारंपरिक जीवनशैलीचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रगतीसाठी ‘पंच परिवर्तन सूत्र’ स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ही पंचसूत्री म्हणजे: १) सामाजिक समरसता, २) कुटुंब प्रबोधन, ३) पर्यावरण, ४) नागरी कर्तव्य आणि ५) स्वजागृती. या सूत्रांच्या माध्यमातून समाजाला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर घेऊन जाता येईल, असे त्यांनी सांगितले. कुटुंब व्यवस्था, कुटुंबातील समस्या आणि नातेसंबंधांवरही त्यांनी विचार व्यक्त केले.
या बैठकीत माजी सभापती मारोतराव इचोडकर, युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, प्रा. अनिल होळी, निवृत्त सहआयुक्त माधुरी मडावी, देवराव आलम आणि प्रदीप कुलसंगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे यशस्वी संचालन उमेश ऊईके यांनी केले.
यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुरज मडावी, दुर्गापूरचे सरपंच परमेश्वर गावडे, कुरुडचे सरपंच विनोद मडावी, अजय पदा, रामापाटील पदा, सुमित कुमरे, डॉ. किसन ताराम, गोपाल जुमनाके, निलेश आत्राम, विद्या दुग्गा, रुपेश सलामे, बादल मडावी, विलास उईके, खुशाल मरस्कोल्हे, देवराव अलाम, अजय पदा, रामा पदा, आरती कोल्हे, प्रदीप कुलसंगे, प्रियदर्शन मडावी, मालता पुडो, बबिता उसेंडी, मालता पुराम, पराग कन्नाके, रोहित परचाके, श्याम सलामे, निलेश आत्राम, घनश्याम मडावी, दिलीप गावडे यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



