
गडचिरोली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरेतील योग, योगासने व योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित करत, गडचिरोली पोलीस दलाने २१ जून ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग शिबिरांचे आयोजन केले. धकाधकीच्या जीवनात शरीर आणि मनाला सशक्त ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे शिबिर गडचिरोली पोलीस मुख्यालय तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस उप-मुख्यालय आणि कार्यालयांमध्ये घेण्यात आले.
गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे सकाळी ६:३० वाजता आयोजित योग शिबिरात पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय, विशेष अभियान पथक आणि राज्य राखीव पोलीस दलातील १००० हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. याशिवाय, पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता येथेही जवळपास ५०० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.

या योग शिबिरांमध्ये योगाचे विविध प्रकार शिकवण्यात आले. पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील शिबिरादरम्यान योग प्रशिक्षक संतोष भाऊराव वेखंडे यांनी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना योगासनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी योग कसा करावा, कोणती योगासने शरीर आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपले सर्वांगीण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि सकारात्मकता निर्माण होण्यासाठी योग हे उत्तम साधन आहे.” त्यांनी आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाला स्थान देऊन दररोज किमान २० मिनिटे योगासाठी वेळ देण्याचे आवाहन केले.
या योग शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप आणि योगा प्रशिक्षक संतोष वेखंडे हे उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयाचे रापोनि. अनुजकुमार मडामे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल आणि इतर शाखा/पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी/अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.



