
नागपूर एमआयडीसी हद्दीतील खळबळजनक घटना
नागपूर : अनैतिक संबंधांच्या संशयाच्या किड्याने ग्रासलेल्या एका पतीने पत्नीवर फावड्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रिंकी किशोर प्रधान (वय २३, रा. पंचशीलनगर, एमआयडीसी) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती किशोर शंकर प्रधान (वय ३१) याला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रधान कुटुंब मूळचे ओडिसा राज्यातील असून, कामाच्या शोधात हिंगणा एमआयडीसी परिसरातील ईसासनी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून किशोर हा रिंकीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी रिंकी फोनवर बोलत असताना किशोरला संशय आला आणि त्याला प्रचंड संताप अनावर झाला. यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. रागाच्या भरात किशोरने घरातील फावड्याने रिंकीच्या डोक्यावर जोरदार वार केले. गंभीर जखमी झालेल्या रिंकीला किशोरनेच लता मंगेशकर इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी किशोर प्रधान याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी किशोर हा गॅरेजमध्ये काम करत होता. एक महिन्यापूर्वी रिंकी इंस्टाग्रामवरील मित्रासोबत बाहेर गेली होती, तेव्हापासून किशोरचा संशय अधिकच बळावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



