
बेतकाठी-बोरी मार्गावर सापळा रचून २३.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त ; नागपूरचे ५ आरोपी ताब्यात
कोरची : तालुक्यात ट्रकमधून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची माहिती मिळताच कोरची आणि बेतकाठी पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून २६ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. ही मोठी कारवाई रविवार (दि. २६ ऑक्टोबर) रोजी रात्री उशिरा बेतकाठी-बोरी मार्गावर करण्यात आली. पोलिसांनी दोन वाहनांसह एकूण २३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
बेतकाठी ते बोरी परिसरात जनावर तस्करी करणारे वाहन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने बेडगाव पोलीस मदत केंद्र आणि कोरची पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. पोलिसांनी एमएच ४० / सीटी ७८९२ क्रमांकाचा जनावरांनी भरलेला ट्रक ताब्यात घेतला. तसेच, या ट्रकला पायलटिंग (मार्गदर्शन) करणाऱ्या मालकासह त्याच्याकडील एमएच ३१ / जीए ०३१३ क्रमांकाचे चारचाकी वाहनही जप्त केले. याप्रकरणी अरबाज कुरेशी, मोहम्मद झईद गो. जावेद, शेख भोलू (पायलटिंग करणारे) आणि ट्रकचालक अजय चौधरी, ट्रकचा क्लिनर संजय पानसे (सर्व रा. नागपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुटका करण्यात आलेल्या सर्व २६ गोवंशांना ज्ञान फाऊंडेशन गोशाळा, गराडा (लाखणी) येथे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक गोकुलराज जी आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



