क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

घातपाताच्या तयारीत असलेले ५ नक्षली ताब्यात, तिघांना अटक

बिनागुंडा येथे कारवाई : १६ लाखांच्या बक्षिसासह डीव्हीसीएम स्तराचा नक्षली अटकेत ; शस्त्रसाठा जप्त 

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांविरुद्ध अनेक हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या पाच नक्षलवाद्यांना मंगळवार, २० मे रोजी गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली असून, इतर दोघांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण १०३ माओवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील मौजा बिनागुंडा येथे ५० ते ६० नक्षलवादी पोलीस जवानांवर हल्ला करून घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-६० (विशेष कृती दल) ची ०८ पथके आणि ए कंपनी ३७ बटालियन सीआरपीएफचे पथक रविवार, १८ मे रोजी सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आले होते.

१९ मे रोजी सकाळी सी-६० पथके माओवादविरोधी अभियान राबवत असताना बिनागुंडा गावाला शिताफीने घेराबंदी करून गावात शोध सुरू केला. त्यावेळी हिरवे-काळे गणवेश आणि साध्या वेशात हत्यारांसह असलेले काही संशयित व्यक्ती पोलीस पथकावर घातपात करण्याची योजना आखत असल्याचे दिसून आले. गावात सामान्य नागरिकही उपस्थित असल्याने पोलीस पथकाने गोळीबार न करता अत्यंत कौशल्याने पाच नक्षलवाद्यांना त्यांच्याकडील हत्यारांसह ताब्यात घेतले. मात्र, इतर माओवादी गावाचा आणि जंगल परिसराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.

ताब्यात घेतलेल्या नक्षल्यांची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणण्यात आले. त्यांची नावे १) उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम, प्लाटून क्रमांक ३२), वय २८ वर्षे, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छत्तीसगड), २) पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम, प्लाटून क्रमांक ३२), वय १९ वर्षे, रा. कोंचल, ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छत्तीसगड), ३) देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य, प्लाटून क्रमांक ३२), वय १९ वर्षे, रा. मारोट बाकापंचायत, ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छत्तीसगड) आणि इतर दोन जहाल माओवादी सदस्य असल्याचे उघड झाले. अधिक चौकशीत हे पाचही जण सक्रिय नक्षली असून घातपात घडवण्याच्या उद्देशाने बिनागुंडा जंगल परिसरात आले होते, असे निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या नक्षल्यांकडून ०१ एसएलआर रायफल, ०१ .३०३ रायफल, ०३ सिंगल शॉट रायफल, ०२ भरमार बंदुका, ०३ वॉकीटॉकी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

यापैकी उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली, पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी आणि देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता या तिघांना २० मे रोजी अटक करण्यात आली आहे. इतर दोन नक्षलवाद्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याची पडताळणी सुरू आहे.

अटक केलेल्या माओवाद्यांवरील शासनाचे बक्षीस :

१) उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली याच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. २) पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी हिच्यावर महाराष्ट्र शासनाने ०८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ३) देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता हिच्यावर महाराष्ट्र शासनाने ०४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ४) इतर दोन माओवादी सदस्यांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रितपणे एकूण ०८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट ३७ बटा. सीआरपीएफ दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथकाचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या कारवाईनंतर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले असून, नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button