
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – माजी आ. डॉ. होळी
गडचिरोली : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले धान आणि मका पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.
डॉ. होळी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासकीय पातळीवर जो काही पाठपुरावा करावा लागेल, तो आपण करणार आहोत. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची माहिती अवगत करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याची आकडेवारी त्वरित मिळण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याची गरज आहे. याबाबत डॉ. होळी यांनी जिल्हा प्रशासनाशी संवाद साधत त्यांना निर्देश दिले. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



