कोरची-कुरखेडा मार्गावर तब्बल १२ तासांचा जाम ; वाहनांच्या रांगाच रांगा

नागरिक संतप्त, प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप
कोरची : कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील ८ किलोमीटर लांबीच्या वळणी घाटात रविवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास एका नादुरुस्त ट्रकमुळे तब्बल १२ तासांचा जाम लागला. छत्तीसगडहून बंगळूरकडे जाणारा हा ट्रक नादुरुस्त झाल्याने सुमारे ५ ते ६ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे प्रवासी, विशेषतः महिला आणि लहान मुलांना प्रचंड हाल सोसावे लागले.
या वाहतूक कोंडीत एका गरोदर महिलेला ५ तास अडकून पडावे लागले, तर काही चिमुकल्यांनी पाणी आणि जेवणाविना रात्र काढली. एका शासकीय बसमधील ४० प्रवाशांनाही तब्बल ५ तास खोळंबून राहावे लागले.
महत्त्वाची बाब म्हणजे, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हता, त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावर सुरजागड येथील लोहखनिज घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रकमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले.
कोरची-कुरखेडा महामार्गावरील हा वळणी घाट अतिशय अरुंद असून, येथे नेहमीच हलक्या आणि जड वाहनांची वर्दळ असते. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहने नादुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. प्रशासनाने या मार्गाची दुरुस्ती करून तो रुंद करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.



