आरोग्यगोंदियाविदर्भ

मगरडोह येथे पोलिसांसाठी विशेष आरोग्य मेळावा ; ‘एक दिवस पोलिसांसाठी’ उपक्रमातून आरोग्याची तपासणी

देवरी : कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपी दौरे आणि नक्षलविरोधी गस्त यांसारख्या कामांमुळे पोलिसांना जास्त वेळ कर्तव्य बजावावे लागते. यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून देवरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि नक्षल प्रभावित पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत मगरडोह येथे “एक दिवस पोलिसांसाठी” या नावीन्यपूर्ण उपक्रमातून साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत २४ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पालांदूर/जमी. मार्फत सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे मगरडोह येथील पोलीस आणि कार्यक्षेत्रातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो. अनेकदा त्यांना पंधरा ते सोळा तास काम करावे लागते. जागरण, अवेळी जेवण यामुळे अनेक व्याधी जडू शकतात. पोलिसांनी निरोगी राहावे या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरभी गिर्हेपुंजे यांनी यावेळी सांगितले.

या शिबिरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जमादार, हवालदार असे विविध पदांचे अधिकारी, कर्मचारी आणि कार्यक्षेत्रातील नागरिक यांची रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल, विविध प्रयोगशाळा तपासणी (रक्त तपासणी) आणि समुपदेशन करण्यात आले. सोबतच स्थलांतरित लोकांचे हिवताप रक्त नमुने आणि आरडीके किट ने रक्त तपासणी देखील करण्यात आली. चाळिशीनंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याच्या सगळ्या चाचण्या करणे गरजेचे असल्याचे डॉ. सुरभी गिर्हेपुंजे यांनी याप्रसंगी म्हटले.

शिबिरादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरभी गिर्हेपुंजे, आरोग्य सहायिका शोभा पडोळे, आरोग्य सेविका साधना डोरले, फार्मासिस्ट मोनिका बहेकार, आरोग्य सेवक सदाशिव अण्णाकडे तसेच आशा सेविका यांनी आरोग्य सेवा दिली. उपस्थितांना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरभी गिर्हेपुंजे यांनी सिकलसेल आणि असंसर्गजन्य आजार जसे रक्तदाब, मधुमेह व कर्करोग यांविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले.

सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस ठाणे मगरडोहच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नारखेडे, खेदराज राऊत आणि त्यांचे पोलीस हवालदार यांनी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button