आरोग्यगोंदियाविदर्भ

सामाजिक वनीकरण विभागात आरोग्य तपासणी शिबिर

एनसीडी जनजागृती अभियानांतर्गत ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी

गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या (१७ मे) अनुषंगाने, एनसीडी जनजागृती अभियानाचे आयोजन १७ मे ते १६ जून पर्यंत संपूर्ण महिनाभर विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र शासनाने कळवले आहे. या निर्देशानुसार, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ मे रोजी गोंदिया येथील सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयात आरोग्य शिबिर घेण्यात आले.

गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथील सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयात झालेल्या या शिबिरात ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्तदाब (बीपी) आणि रक्तातील साखर (ब्लड शुगर) यांची तपासणी करण्यात आली. यासोबतच हृदयरोग तपासणी, मधुमेह, दैनंदिन आरोग्य, व्यायाम, संतुलित आहार व घ्यावयाची काळजी, वजन नियंत्रित ठेवणे इत्यादी विषयांवर तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांनी दिली.

सद्यस्थितीत कार्यालयातील मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येतो. अनेकदा नऊ ते दहा तास काम करावे लागते. जागरण, अवेळी जेवण, अयोग्य जीवनशैली, असंतुलित आहार आणि व्यसन यामुळे अनेक व्याधी जडू शकतात. प्रत्येक कर्मचाऱ्याने चाळिशीनंतर आपल्या आरोग्याच्या सगळ्या चाचण्या नियमित वेळेत करणे गरजेचे असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी याप्रसंगी म्हटले आहे.

शिबिरात उपस्थित डॉ. सोनम जाधव यांनी नियमित बीपी व शुगरची तपासणी केल्यामुळे आपण असंसर्गजन्य रोगांपासून कसे दूर राहू शकतो याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विविध प्रकारच्या व्यायामांचे प्रात्यक्षिक देऊन उपस्थितांना शारीरिक तंदुरुस्ती कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी व्यायामाचे योगदान राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या भौतिकोपचार तज्ञ डॉ. कांचन भोयर यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जनजागृती पॅम्पलेट वाटप करून जनजागृती करण्यात आली.

आरोग्य विभागाच्या या आरोग्य शिबिरामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याची जाण व जबाबदारीने काळजी घेण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे गोंदिया सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी टी.एच. ढमढेरे यांनी याप्रसंगी म्हटले आहे. त्यांनी भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य लेखापाल जे.आर. बघेले व केटीएस रुग्णालयाचे डॉ. सोनम जाधव, आशा खरवडे, निधी मिश्रा यांचे सहाय्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button