
गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत असलेल्या १० जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांमध्ये पदोन्नतीच्या प्रक्रियेवरून तीव्र असंतोष पसरला आहे. शिक्षण विभागाकडून सहायक शिक्षक उच्च श्रेणी पदासाठी नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप हायस्कूल संवर्गातील शिक्षकांनी केला आहे. यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असून, तात्काळ लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी मंत्री, खासदार, आमदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीनुसार, जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सहायक शिक्षक निम्न श्रेणी, सहायक शिक्षक उच्च श्रेणी आणि कनिष्ठ अधिव्याख्याता या पदांवर हायस्कूल संवर्गातील शिक्षक कार्यरत आहेत. या पदांची पदभरती करताना सरळसेवा भरती अंतर्गत स्वतंत्र जाहिरात दिली जाते, तर प्राथमिक शिक्षक पदांसाठी वेगळी जाहिरात व मुलाखत घेतली जाते. तसेच, हायस्कूल संवर्गातील शिक्षकांची बदली केवळ हायस्कूलमध्येच केली जाते, प्राथमिक शाळेत नाही. इतकेच नव्हे, तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण या पदांवर पदोन्नती देतानाही हायस्कूल संवर्गातील शिक्षकांना विकल्प मागितले जात नाहीत, कारण प्राथमिक शिक्षक आणि हायस्कूलमध्ये कार्यरत शिक्षकांचा संवर्ग वेगवेगळा मानला जातो.
मात्र, सहायक शिक्षक उच्च श्रेणी पदाच्या पदोन्नतीसंबंधी ही प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबवली जात असल्याचा आरोप हायस्कूल संवर्गातील शिक्षकांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक शिक्षक आणि सहायक शिक्षक निम्न श्रेणी यांची सेवाज्येष्ठता यादी वेगळी तयार करणे आवश्यक असताना आणि पदोन्नतीसाठी हायस्कूल संवर्गातील निम्न श्रेणी शिक्षकांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे असताना, दि. २६/०५/२०२५ रोजी सहायक शिक्षक उच्च श्रेणी पदाच्या पदोन्नतीसंबंधी सहायक शिक्षक निम्न श्रेणी आणि प्राथमिक शिक्षक यांची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करून प्रकाशित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आक्षेप नोंदवण्यासाठी केवळ एकच दिवसाचा अवधी देण्यात आला आहे.
या अतिशय नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कार्यवाहीमुळे हायस्कूल संवर्गातील शिक्षकांवर घोर अन्याय होत असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या कार्यालयाकडून होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. चंद्रपूर आणि इतर जिल्हा परिषदांमध्ये सहायक शिक्षक उच्च श्रेणी पदाच्या पदोन्नतीसंबंधी सहायक शिक्षक निम्न श्रेणीला प्रथम प्राधान्य देऊन पदोन्नती दिली जाते आणि त्या विषयाचे सहायक शिक्षक निम्न उपलब्ध नसल्यास प्राथमिक शिक्षकांमधून उच्च श्रेणी शिक्षक पदावर पदोन्नती दिली जाते, असे शिक्षकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रशासनाने या अन्यायकारक बाबींकडे विशेष लक्ष घालून न्याय प्रदान करावा, अशी हायस्कूल संवर्गातील शिक्षकांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून निवेदन व आक्षेप अर्ज सादर केले आहेत.



