भंडारामहाराष्ट्रविदर्भ

अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार

कोकणागड फाट्याजवळील महामार्गावरील घटना

भंडारा : दरवर्षी महामार्ग ओलांडतांना वाहनांच्या अपघातात अनेक प्राण्यांचा बळी जात आहे. सातत्याने घटना घडूनही वनविभाग मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याने वन्यप्राण्यांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. अशीच घटना भंडारा तालुक्यातील शिंगोरी-कोकणागड फाट्यादरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वल ठार झाले. अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी वनविभागासह शासनाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताकरीता कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली असून वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वन्यप्रेमींमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

भंडारा वनविभागांतर्गत भंडारा वनक्षेत्रातील नियतक्षेत्र मालीपार येथील कोकणागड फाट्याजवळ महामार्गावर एक अस्वल मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे यांना मिळताच वनकर्मचाऱ्यांचा पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करान गडेगाव वनआगारात मृत अस्वलाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख, माजी मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान व नदीम खान घटनास्थळी हजर होते. पशुधन विकास अधिकारी खुटसावरीचे डॉ. एस.एफ. निपाने तसेच सहाय्यक वनरक्षक सचिन निलख घटनास्थळी उपस्थित होते.

सदर मृत अस्वल हे नर जातीचे असून अंदाजे पाच वर्ष वयोगटातील आहे. पशुवैद्यकीय अधिकारांनी मृत अस्वलाची पाहणी केली असता अवयव शाबूत असल्याचे निदर्शनास आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अदाजानुसार अस्वलाचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. मृत अस्वलाच्या अवयवांचे तपासणीकरीता नमुने उत्तरीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. पुढील तपास उपवनसंरक्षक पवन जेफ यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button