गडचिरोलीविदर्भ

हिवताप प्रतिबंधासाठी ‘शून्य मृत्यू’चे उद्दिष्ट – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

पुजाऱ्यांनी रुग्णांना वैद्यकीय उपचाराकडे वळवावे

गडचिरोली : जिल्ह्यात हिवतापावर प्रभावी नियंत्रण मिळवून मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपले योगदान देण्याचे आणि समन्वयात्मक पद्धतीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा  यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हिवताप नियंत्रण कार्यगट अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी रणजीत यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी कीलनाके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्यातील हिवतापाचा सविस्तर आढावा घेताना जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही भागांत आजही आजारी मुलांना डॉक्टरांकडे नेण्याऐवजी पारंपरिक उपचारासाठी पुजाऱ्यांकडे नेले जाते, ही चिंताजनक बाब असून यावर जनजागृती आवश्यक आहे. याकरिता पुजाऱ्यांसाठीही शिबिरांचे आयोजन करून त्यांच्यामार्फत रुग्णांना वैद्यकीय उपचाराकडे वळवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रमुख सूचना आणि उपाययोजना

जिल्हाधिकारी पंडा यांनी गावात स्वच्छता, फवारणी, मच्छरदाण्यांचा वापर आणि शाळांमार्फत जनजागृती या बाबींवर भर देत ‘आठवड्यातून एक कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले. यामुळे डासांची पैदास कमी होऊन हिवतापाचा प्रादुर्भाव टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मान्सूनपूर्व नियोजन महत्त्वाचे ठरेल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे औषधसाठा, कीटकनाशके, फॉगिंग मशिनसाठी समन्वयाने काम करण्याचे सांगितले.

स्थलांतरित मजुरांकडे विशेष लक्ष द्या

वनविभागाने स्थलांतरित मजुरांची यादी वेळेत उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या आरोग्य तपासणीस मदत होईल. तसेच, सुट्टीहून परतणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांबाबत आदिवासी विभागाने माहिती दिल्यास त्यांच्या तपासणीची व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम, पाथच्या विभागीय समन्वयक डॉ. पूजा धुळे, व्हीबीडी सल्लागार राजेश कार्लेकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संजय समर्थ, आरोग्य सहायक प्रकाश बारसागडे व व्ही.आर. नैताम यांच्यासह जिल्हास्तरीय व तालुका पातळीवरील अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button