
गडचिरोली : गडचिरोली आगाराची उमरखेडकडे जाणारी एसटी बस गुरुवारी (दि.२१) सकाळी शहराबाहेर पडताच भीषण अपघाताला बळी पडली. नवेगाव-मुरखळा गावानजीक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
ख्वाजा शाहबुद्दीन (६०, रा.देसाईगंज), लक्ष्मीबाई दुरकीवार (५५ रा. नवरगाव) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असलेल्या शिवांश नवघरे या बालकाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीवरून सकाळी ७:१५ वाजता ही बस (क्रमांक एमएच १४ बीटी -०७४१) उमरखेडच्या दिशेने रवाना झाली होती. बस शहराच्या हद्दीबाहेर पडताच काही अंतरावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या ७ महिन्यांच्या चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. नरोटे यांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांना सर्व जखमींवर तात्काळ आणि दर्जेदार उपचार करण्याचे निर्देश दिले. रुग्णालयात प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून गंभीर जखमींना आवश्यक ते सर्व वैद्यकीय सहकार्य दिले जात आहे.
या भीषण अपघातामुळे गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक तपासात चालकाचे नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. पोलीस प्रशासनाकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेने एसटी प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अपघातात जखमी
या अपघातात धनश्री ललित चांदेकर, आशिष संघपाल साखरकर, मायाबाई बाबुराव कांबळे, संगीता बाबुराव कांबळे, ज्योती अविनाश पाल, श्रीहरी खळकर, बेबीबाई खळकर, चैतन्य मेडीवार, तानिया मेडीवार, वैशाली माडेवार, रूपाली खणके, ललिता खणके, ऋषभ खडके, सचिन वाळके, जयश्री वरभे, सचिन वरदे, जयश्री खणके, रत्नाकर राऊत, पार्थ राऊत, मंगला कळसकर, भूषण दुरकीवार, चालक रोहित देशमुख, वाहक संदीप पवार, विकी शेंडे, तारा साबळे, श्वेता स्वप्नील नवघरे, डॉ. गणेश जैन, सुमन कत्तलवार, व्यंकट ढगे, अश्विनी तोरपे, किशोर गावतुरे आणि गौरव कुमरे यांच्यासह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.



