क्राईमगडचिरोलीविदर्भ

घोरपडीची शिकार आणि साप पकडण्याचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

धानोरा : वन्यजीवांची शिकार आणि त्यांना पकडण्यासाठी केलेल्या अघोरी प्रकारामुळे धानोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे. घोरपडीची शिकार करून, साप पकडण्यासाठी वारुळाला आग लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन आरोपींना वनविभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई २९ मे रोजी दक्षिण येरपुंडी नियत क्षेत्रातील येनगाव येथे करण्यात आली.

मधुकर दाऊ गावडे (रा. चव्हेला), सुमित दौलत गावडे (रा. चव्हेला), रामदास गनचू दुगा (रा. गोट्याकनार, ता. औधी, जि. मानपूर मोहल्ला, छत्तीसगड) अशी आरोपींची नावे आहेत. या तिन्ही आरोपींनी घोरपडीची शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्राधिकारी एस. डी. पुरमशेट्टेवार, वनरक्षक ए. पी. कड्याम, व्ही. आर. कुमोटी आणि आय. जे. मडावी यांनी दक्षिण येरपुंडी नियत क्षेत्रातील येनगाव येथील कक्ष क्र. ४८६ मध्ये सापळा रचला.

सापळा रचलेल्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांना हे तिघे जण चव्हेला-मुंगनेर रोडच्या बाजूला असलेल्या एका वारुळामध्ये आग लावून बसलेले दिसले. त्यांनी पाहणी केली असता, आरोपींच्या नायलॉनच्या पिशवीत एक जिवंत घोरपड आढळली. धक्कादायक बाब म्हणजे, बाजूला धामण प्रजातीचा एक साप मारलेलाही त्यांना दिसला. वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि वन गुन्हा नोंदवला.

उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा आणि सहायक वनरक्षक पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी एस. डी. पुरमशेट्टेवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३० मेपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button