
सौम्य लक्षणे असल्याने घाबरू नये, पण कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन ; जिल्हा रुग्णालयात RTPCR चाचणी सुरू करण्याचे निर्देश
गोंदिया : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना, गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. हे रुग्ण सौम्य स्वरूपाचे असल्याने जिल्हावासियांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. सद्यस्थितीत दोन्ही रुग्ण घरातच क्वारंटाईन असून, त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. मात्र, गोंदियावासियांनी गाफील न राहता कोविडसदृश लक्षणे दिसताच जवळील आरोग्य संस्थेत जाऊन उपचार करून घ्यावे, तसेच कोविड वर्तणूक बदलाचे नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना शोधून गंभीर लक्षणे नसणाऱ्यांना घरातच ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल यांनी सांगितले.
राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या बघता, सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दि. २ जून रोजी कोविड-१९ मार्गदर्शक सूचना देऊन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात कोरोनाची RTPCR चाचणी सुरू करण्याबाबत सूचित केले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर आणि सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी माहिती दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सहव्याधी असलेले रुग्ण जसे मूत्रपिंड विकार, मेंदूविकार, मधुमेह, हृदयरोगी, कर्करोगी, फुफ्फुसाचे विकार असलेले लोक, विशेषतः वृद्ध सहव्याधी असलेले लोक आणि रोगप्रतिकारशक्तीची कमतरता असलेले लोक, या गटातील लोकांनी कमी हवेशीर किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा अशा ठिकाणी फेस मास्कचा वापर करावा. लोकांनी काळजी घेणे, नागरिकांनी नियमांचे पालन करणे व कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तपासणी करणे हाच संसर्ग रोखण्याचा उपाय असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर यांनी सांगितले.
तीव्र श्वसन आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याचे स्वयंनिरीक्षण ठेवावे आणि जर धाप लागणे, छातीत दुखणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत जाण्याचे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. अग्रवाल यांनी केले आहे.
हाताची स्वच्छता, श्वसन स्वच्छता, खोकण्याची शिष्टाचार (खोकताना किंवा शिकताना तोंड किंवा नाक झाकणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे इत्यादी) यासारख्या स्वच्छतापूर्ण वर्तनाचे समुदायाने पालन करण्याची गरज असल्याचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी माहिती दिली आहे.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्दी, खोकला व तापसदृश लक्षणे असल्यास गर्दीत न जाणे किंवा फेस मास्कचा वापर करणे, सुरक्षित दोन फुटांचे सामाजिक अंतर ठेवणे, नियमित हात वारंवार स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी इतरत्र कुठेही न थुंकणे, शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर करणे हे कोविड वर्तणूक बदलाचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे व नियमांचे पालन करणे हे स्वयंस्फूर्तीने केले तरच संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. जिल्ह्यात बाहेरून येणारे परदेशातील, परराज्यातील लोकांनी सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी वा इतर कोणतीही लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून उपचार करण्याबाबत आवाहन डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.



