आरोग्यगोंदियाविदर्भ

उच्च रक्तदाब जनजागृती अभियानांतर्गत आरोग्य शिबिर

नगर परिषद कार्यालयात ४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी ; ‘सायलेंट किलर’बाबत जनजागृतीवर भर

गोंदिया : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन (१७ मे) च्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात १७ मे २०२५ ते १६ जून २०२५ या कालावधीत महिनाभर एनसीडी जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर व जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांच्या संकल्पनेतून ३ जून रोजी नगर परिषद गोंदिया कार्यालयात एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात नगर परिषदेचे एकूण ४३ अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. स्नेहा वंजारी यांनी दिली. नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कांबळे यांच्या विशेष सहकार्याने हे आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या या जागतिक उच्च रक्तदाब जनजागृती अभियानादरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांमधून मधुमेह व रक्तदाबाची तपासणी करून लोकांमध्ये या आजारांबाबत जनजागृती केली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनम जाधव यांनी दिली.

३ जून रोजीच्या शिबिरात एकूण ४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने रक्तदाब (बीपी) आणि रक्तातील साखर (ब्लड शुगर) यांची तपासणी करण्यात आली. डॉ. सोनम जाधव यांनी तपासणी व समुपदेशन केले. या तपासणीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा मुख्य उद्देश होता. यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची जनजागृती करणारी माहितीपत्रके वाटप करून लोकांना या आजाराबद्दल शिक्षित करण्यात आले.

हे आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागाच्या डॉ. सोनम जाधव, डॉ. स्नेहा वंजारी आणि निधी मिश्रा यांनी उपस्थित राहून आरोग्य सेवा दिली.

डॉ. स्नेहा वंजारी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम यांनी उच्च रक्तदाबाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते कारण त्याची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. परंतु, तो हळूहळू हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूला नुकसान पोहोचवू शकतो. जेव्हा आपल्या शरीराच्या नसांवर रक्ताचा दाब जास्त असतो, तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात.

डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, अंधुक दृष्टी, छातीत दुखणे किंवा चिंता, श्वास घेण्यास त्रास होणे. कधीकधी रक्तदाब जास्त असला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जास्त मीठ खाणे, जास्त तळलेले किंवा जंक फूड खाणे, चिंता किंवा ताण, लठ्ठपणा, व्यायाम न करणे, मद्यपान आणि धूम्रपान करणे आणि अनुवंशिक कारणे.

आपल्या आहारातील मीठ कमी करा, दररोज थोडा व्यायाम किंवा जास्त चालायला सुरुवात करा, ताजी फळे आणि भाज्या खा, ताण कमी करा, ध्यान किंवा योगासने करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा आणि नियमितपणे रक्तदाब तपासा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button