नागपूर येथील रामन विज्ञान केंद्रात ‘जागतिक छायाचित्रण दिना’निमित्त विशेष स्पर्धा व प्रदर्शन; मीडिया फोटोग्राफर्सना सुवर्णसंधी!

नागपूर येथील रामन विज्ञान केंद्रात ‘जागतिक छायाचित्रण दिना’निमित्त विशेष स्पर्धा व प्रदर्शन; मीडिया फोटोग्राफर्सना सुवर्णसंधी!
नागपूर, दि १ ४ :’जागतिक छायाचित्रण दिन २०२६’चे औचित्य साधून नागपूर येथील रामन विज्ञान केंद्र आणि तारांगण (राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) तर्फे ‘पीआरएसआय’ (नागपूर चॅप्टर) आणि ‘हिंदी पत्रकार संघ, नागपूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष छायाचित्रण स्पर्धा व प्रदर्शनाचे (Photography Competition-cum-Exhibition) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी “Science Through the Lens” (कॅमेऱ्याच्या नजरेतून विज्ञान) ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
विज्ञान आणि कला यांचा सुरेख संगम घडवून आणणे तसेच प्रसारमाध्यमांतील छायाचित्रकारांच्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून विज्ञान सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेविषयी महत्त्वाची माहिती
आयोजन तारीख: १९ ऑगस्ट २०२६
स्थळ: रामन विज्ञान केंद्र आणि तारांगण, नागपूर
स्पर्धेचा विषय (Theme): “Science Through the Lens”
पात्रता: प्रिंट, टीव्ही, डिजिटल, न्यूज एजन्सी व इतर मान्यताप्राप्त मीडिया संस्थांशी जोडलेले छायाचित्रकार.
प्रविष्टीचे स्वरूप: प्रत्येक सहभागी छायाचित्रकार कमाल २ छायाचित्रे (A4 आकाराची हार्ड कॉपी) सादर करू शकतात.
अंतिम मुदत: छायाचित्रे जमा करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२६ ही आहे.
आकर्षक पारितोषिके आणि प्रदर्शन
स्पर्धेतील गुणवंत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. यासोबतच, प्राप्त प्रविष्टींमधून निवडलेल्या उत्तम छायाचित्रांचे १९ ऑगस्ट २०२६ रोजी रामन विज्ञान केंद्राच्या प्रांगणात विशेष प्रदर्शन भरवले जाईल.
रामन विज्ञान केंद्र प्रशासनाने नागपूर व परिसरातील सर्व पात्र मीडिया छायाचित्रकारांना या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विज्ञानाचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचे आवाहन केले आहे.



