क्राईमगडचिरोलीविदर्भ

३१ लिटर मोहफुलाची दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तळेगाव व मोहगाव येथे पोलीस आणि मुक्तिपथ टीमची संयुक्त कारवाई; इतर विक्रेत्यांना अखेरचा इशारा

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील तळेगाव आणि मोहगाव येथे कुरखेडा पोलिस आणि मुक्तिपथ तालुका टीमने संयुक्तपणे धडक कारवाई केली. या कारवाईत ३१ लिटर मोहफुलाची दारू, सडवा व दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून, दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, इतर विक्रेत्यांना अवैध व्यवसाय बंद करण्याची शेवटची ताकीद देण्यात आली आहे.

पोलिस आणि मुक्तिपथ टीमने तळेगाव येथील दोन विक्रेत्यांच्या घरांची झडती घेतली असता, जितेश बाबुराव नैताम याच्या घरी १० लिटर मोहाची दारू सापडली. याप्रकरणी नैताम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, मोहगाव येथे तीन विक्रेत्यांच्या घरी धाड टाकली असता, संगीता हेमराज मडावी या महिलेकडे मोहफुल सडवा आणि २१ लिटर मोहाची दारू मिळून आली. याप्रकरणी संगीता मडावी हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे मोहगाव आणि तळेगाव येथे कारवाई करत एकूण दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, इतर विक्रेत्यांना यापुढे दारूविक्री न करण्याबाबत समज देण्यात आली.

या मोहिमेत पोलीस विभागातर्फे पीएसआय भोम्बे, संतोष कांबळे आणि वर्षा बोरसे हे सहभागी झाले होते. तर मुक्तिपथतर्फे तालुका संघटक शारदा मेश्राम, तालुका प्रेरक जीवन दहीकर आणि महेश खोब्रागडे उपस्थित होते. या संयुक्त कारवाईमुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button