
सात जुगाऱ्यांना अटक
भंडारा : पोलिस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत येणाऱ्या खरबी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, सात मोबाइल आणि सहा दुचाकींसह ४ लाख ४४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, खरबी येथील घाटोळे यांच्या शेतालगत असलेल्या पांदण रस्त्यावर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक दुधकावरा व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी सात आरोपी रंगेहात मिळून आले, तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. अधिन मनसजन थोटे (२६, रा. खरबी), मनिष गुलाब गौरखेडे (२८, रा. खराडी), स्वरूप हर्षल मेश्राम (३०, रा. खरबी), रोहित प्रभाकर लांडे (२६, रा. महादुला), आकाश श्रीधर बावनकर (२८, रा. मौदा), पंढरी नामदेव हटवार (४५, रा. खरबी) आणि पांडुरंग गोपीचंद आकरे (३७, रा. खरबी) यांचा समावेश आहे. तसेच आशिष निहेपुंजे (३२, रा. खरबी) आणि आकाश पैदाम (३०, रा. खरबी) हे दोन आरोपी पसार झाले.



