
फेब्रुवारी २०२६ पर्यंत धान विक्री करणाऱ्या आदिवासी व बिगर आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या (TDC) माध्यमातून धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, ७३ कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून, ९ मार्चपासून प्रत्यक्ष रक्कम खात्यात येण्यास प्रारंभ झाला आहे.
जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी शेतकऱ्यांनी फेब्रुवारी २०२६ पर्यंत खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. मात्र, त्यांचे चुकारे प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत होते. ही बाब लक्षात घेऊन कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सह-पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या निर्देशानुसार आदिवासी विकास महामंडळाने तातडीने निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतला.
माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केवळ पत्रव्यवहार न करता संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदने सादर केली होती. या सक्रिय भूमिकेमुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात आता हक्काचे पैसे जमा होत आहेत. ७ मार्च रोजी हा निधी जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आणि ९ मार्चपासून त्याचे वितरण सुरू झाले.
धान विक्रीचे थकीत पैसे मिळाल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी-केंद्रित भूमिका घेऊन प्रशासनाकडून निधी खेचून आणल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनांकडून कृष्णा गजबे यांचे विशेष कौतुक केले जात आहे. या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असून, प्रलंबित चुकाऱ्यांचा प्रश्न निकाली निघाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट दूर झाले आहे.



