मुख्यमंत्री फडणवीस नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात, ‘कवंडे’ला भेट देऊन वाढवले पोलिसांचे मनोबल

छत्तीसगड सीमेवर नव्याने उभारलेल्या पोलीस ठाण्याची पाहणी; म्हणाले, “पोलिसांनी सीमेपलीकडे जाऊनही ऑपरेशन केली”
गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. ६ जून) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या अतिसंवेदनशील कवंडे गावाला भेट दिली. कवंडे हे गाव नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते, जिथून छत्तीसगड राज्यातून माओवादी महाराष्ट्रात प्रवेश करतात.
या भागातील नक्षल्यांचा प्रवेशद्वार बंद करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी नुकतेच ९ मार्च रोजी कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशन उभारले आहे. याशिवाय, १० ते १५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा आणि पेनगुंडा अशी आणखी दोन पोलीस स्टेशन उभारून नक्षल्यांची कोंडी करण्यात आली आहे.
आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागात अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले. पोलिसांच्या जनजागरण मेळाव्यात त्यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यांनी भागातील जनतेशी देखील संवाद साधला. विशेष म्हणजे, कालच लगतच्या छत्तीसगड राज्यात माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर याला ठार मारण्यात आले होते. या घटनेला २४ तास पूर्ण होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अतिसंवेदनशील कवंडे गावात पोहोचून धाडसी भेट दिली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या पोलिसांनी छत्तीसगडच्या सीमेमध्ये जाऊन देखील ऑपरेशन केली आहेत, त्यामुळे मला असे वाटते की, पोलीस आणि प्रशासन दोघेही मिळून शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेले आहेत. छत्तीसगडमध्ये केंद्र सरकारच्या मदतीने सुरक्षेचे काम सुरू आहे. यामुळे चारही बाजूंनी नक्षल्यांची कोंडी होणार आहे.” छत्तीसगडमध्ये जी भरती (माओवादी) होत होती, ती चिंतेची बाब होती, मात्र आता केंद्र सरकारने मिळून नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खातमा केला आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस जवान राहत असलेल्या टेंट आणि कंटेनरची पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या भागातील परिस्थिती मुख्यमंत्र्यांना अवगत करून दिली. त्यांनी पोलिसांसोबत देखील संवाद साधला.



