गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील ‘कवंडे’ गावात ऐतिहासिक भेट

सी-६० कमांडोंना अत्याधुनिक शस्त्रे प्रदान; नक्षलवादाचा मार्च २०२६ पर्यंत खात्मा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट

कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण ; शस्त्रांसह शरणागती पत्करण्याची पहिलीच घटना

गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ६ जून रोजी थेट महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अत्यंत दुर्गम आणि नक्षलप्रभावित कवंडे गावाला ऐतिहासिक भेट दिली. या अतिदुर्गम भागात जाणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधींचे बक्षीस असलेल्या १२ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, ज्यात दोन महिला नक्षलवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. नक्षल्यांनी शस्त्रांसह शरणागती पत्करण्याची अशाप्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे.

यापूर्वी शरणागती पत्करलेल्या 13 पूर्वाश्रमीच्या नक्षल्यांचा आज एक सामूहिक विवाह सोहळाही गडचिरोलीत आयोजित करण्यात आला होता, त्याला हजेरी लावत त्यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

ऐतिहासिक आत्मसमर्पण आणि सी-६० कमांडोंचा सन्मान: जिल्हा पोलीस दल आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सी-६० कमांडोंच्या शौर्याचे कौतुक केले. याप्रसंगी २० पेक्षा अधिक सी-६० जवानांना त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल विशेष प्रमाणपत्रे, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना अत्याधुनिक अशी एके-१०३ शस्त्रे आणि एएसएमआय पिस्तुल, तसेच बुलेटप्रूफ जॅकेट्स प्रदान करण्यात आली.

याच कार्यक्रमात १२ नक्षलवाद्यांनी मंचावर शस्त्रे खाली ठेवून पोलीस व प्रशासनाच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. या सर्वांवर एकूण एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे बक्षीस होते. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट देण्यात आली. त्यांच्या पुनर्वसन आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी त्वरित योजना कार्यान्वित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. लॉयड्ससारख्या उद्योगांनी पुनर्वसनात मोठा हातभार लावला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीसांचे कवंडेला भेट आणि संवाद: आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कवंडे आऊटपोस्टला भेट देऊन गावकर्‍यांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “आपल्या पोलीस दलाने अवघ्या २४ तासांत कवंडे आऊटपोस्टचे निर्माण केले. हे केवळ पोलीस ठाणे नाही, तर शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आहे. जेथे सुरक्षेची कमतरता होती, तेथे पोलीस ठाणे उघडत शासन-प्रशासन जनतेपर्यंत पोहोचविले जात आहे.” गेल्या दोन वर्षांत अशा ६ आऊटपोस्ट तयार केल्या असून, गेल्या दीड वर्षांत २८ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, ३१ माओवाद्यांना अटक झाली, तर ४४ लोकांनी आत्मसमर्पण केले. “हा एक नवीन रेकॉर्ड आहे. ज्यांच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षीसं होती, असेही अनेक आता माओवाद सोडून सामान्य जीवनात परत येत आहेत. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे,” असे ते म्हणाले. कवंडे येथे अतिशय कठीण ऑपरेशन्स आपल्या जवानांनी केल्याचे सांगत, “ज्या बेटावर नक्षलवादी लपून बसले होते, ते ठिकाणही मी आज पाहिले. डोके पाण्यात बुडेल, अशा ठिकाणी कसब दाखवून तुम्ही ४ नक्षल्यांना यमसदनी धाडले, हे कौतुकास्पद आहे.”

नक्षलवादाचा खात्मा करण्याचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा महाराष्ट्रातून खात्मा करायचा, हे आपले टार्गेट असल्याचे स्पष्ट केले. “महाराष्ट्रात ४ वर्षांपासून नक्षल भरती पूर्णपणे थांबली होती. पण, अन्य राज्यातून ती व्हायची. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय कठोर पाऊले उचलली आणि आता नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

विकासकामांवर भर: या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या १९ चारचाकी वाहनांच्या चाब्या पोलीस दलाकडे सुपूर्द केल्या, ज्यात काही बुलेटप्रूफ वाहने आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्ह्याला ‘रोजगारयुक्त’ आणि ‘भारताचे पोलाद शहर’ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा निर्धार व्यक्त केला, मात्र हे करताना येथील निसर्गसंपदा, जल, जमीन, जंगल कायम ठेवूनच हा विकास करण्याचा निर्धार असल्याचे सांगितले.

लाभार्थी मेळावा आणि जनतेशी संवाद: तेलंगणा सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त कवंडे भागात आयोजित लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेशी संवाद साधला. “गडचिरोलीला नक्षलमुक्त व औद्योगिकदृष्ट्या सक्षम जिल्हा बनवण्याचा आमचा निर्धार आहे. शासन आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून नक्षलग्रस्त भागात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून, शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे लोकांमध्ये शासनाबाबतचा विश्वास वाढला आहे. हीच खरी लोकाभिमुख विकास प्रक्रिया आहे,” असे ते म्हणाले. कवंडे, नेलगुंडा आणि पेनगुंडा या ठिकाणी नुकत्याच ‘धरती आबा’ अभियानांतर्गत शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये एकूण ५३३ लाभार्थ्यांना विविध योजनांचे ९८७ लाभ वितरित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, अन्न सुरक्षा योजना, पीएम किसान सन्मान निधी, मनरेगा जॉब कार्ड, स्क्रिनिंग व ॲनिमिया तपासणी, आधार अद्ययावत करणे, जात प्रमाणपत्र आदी योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. महसूल, आरोग्य, कृषी, सामाजिक न्याय, पंचायत राज, महिला व बालकल्याण, वन विभाग, पोलीस आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या पुलाची पाहणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रोनच्या मदतीने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील निर्माणाधीन पुलाची पाहणी केली. राज्यमार्ग ३८० वरील १०० मीटर रुंद कोरमा नाल्यावर सध्या १२० मीटर लांबीचा पूल उभारण्यात येत असून, यामुळे महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांत थेट दळणवळण शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी १० कोटी ७० लाख रुपयांची तांत्रिक मान्यता प्राप्त असून, हा पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. या पुलाच्या निर्माणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गावांनाही सुकर दळणवळणाची सुविधा प्राप्त होणार असून, प्रशासनाच्या सेवा व विकास कार्यक्रम प्रभावीपणे पोहोचण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या दौऱ्यात मंत्री आशिष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button