
गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे आवाहन; १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींचे होणार मोफत लसीकरण
गोंदिया : महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमाण कमी करण्यासाठी आणि मुलींचे आरोग्यविषयक भविष्य सुरक्षित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून जिल्ह्यात ‘एचपीव्ही’ (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पालकांना आपल्या मुलींचे लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘एचपीव्ही’ लसीकरण जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आरोग्य विभागाला ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, “एचपीव्ही लसीकरण हे अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आहे. पालकांनी कोणतीही भीती न बाळगता पुढाकार घेतल्यास आपण भविष्यातील कॅन्सरचा धोका टाळू शकतो.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी माहिती दिली की, ज्या मुलींचे वय १४ वर्षे पूर्ण झाले आहे, मात्र १५ वर्षे पूर्ण व्हायची आहेत (१४ ते १५ वर्षे वयोगट), अशा मुलींना या मोहिमेअंतर्गत लस दिली जाईल. ही लस एकाच डोसद्वारे दीर्घकाळ संरक्षण देण्यास सक्षम आहे.
प्रमुख धोका: भारतात महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग असून यामुळे दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू होतो. प्रभावी उपाय: लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी (वयाच्या ९ ते १४ वर्षांच्या दरम्यान) ही लस घेतल्यास शरीरात उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. विनामूल्य मोहीम: केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेत ‘गार्डासिल-४’ (Gardasil-4) ही लस मोफत दिली जाणार आहे. संसर्ग रोखणे: एचपीव्ही संसर्ग हा स्पर्शातून किंवा लैंगिक संबंधातून पसरतो, लसीकरण या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत करते.
या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, डॉ. अरविंदकुमार वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोहिमेचे सादरीकरण डॉ. रोशन राऊत यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाणार असून, पालकांनी आपल्या मुलींचे लसीकरण करून त्यांना ‘कॅन्सरमुक्त’ भविष्याची भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



