
काँग्रेस शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणार
गडचिरोली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वात १२ जून २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यात ‘शेतकरी न्याय यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.
या ‘शेतकरी न्याय यात्रे’त विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार रामदास मसराम, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, निरीक्षक सचिन नाईक, मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी बांधव, युवक, महिला, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.



