गडचिरोलीविदर्भ

जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

खासगीतील लाखो रुपयांचा उपचार आता शासकीय रुग्णालयात मोफत ; गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा

गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवेने आधुनिकतेकडे मोठी झेप घेत, प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (Total Knee Replacement – गुडघा प्रत्यारोपण) ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. या यशामुळे आता दुर्गम भागातील अस्थिव्यंगाच्या रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरली नाही.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया पार पडली. खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो, जो सामान्य आणि गोरगरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. मात्र, आता ही सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्याने गडचिरोलीकरांसाठी उपचाराची नवी दारे उघडली आहेत.

या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ (Orthopedic Surgeons), भूलतज्ज्ञ (Anesthetists), ऑपरेशन थिएटरमधील सुश्रुषा व तांत्रिक कर्मचारी यांच्या विशेष चमूने मोलाची भूमिका बजावली. शासकीय यंत्रणेतही अशा प्रकारच्या हाय-टेक शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकतात, हे या टीमने सिद्ध करून दाखवले आहे.

या यशाबद्दल बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या, “जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्य सेवा स्थानिक स्तरावरच मिळावी, यासाठी आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया आमच्या पूर्ण टीमच्या जिद्दीचे फळ आहे.” अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांनी टीमचे कौतुक करताना सांगितले की, आगामी काळात अशा अनेक आधुनिक शस्त्रक्रिया रुग्णालयात नियमितपणे राबवल्या जातील, ज्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची परवड थांबेल.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय पथकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button