
‘आदिवासी जनसंवाद यात्रे’निमित्त जिल्हास्तरीय आढावा ; केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश
भंडारा : भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘आदिवासी जनसंवाद यात्रे’ दरम्यान, भंडारा जिल्हा भाजपा कार्यालयात आदिवासी मोर्चाची जिल्हास्तरीय संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. देवराव होळी यांनी आगामी काळात आदिवासी मोर्चाचे संघटन अधिक व्यापक आणि मजबूत करण्यावर भर दिला. ते म्हणाले की, “जनगणना, SIR प्रक्रिया आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने आतापासूनच सज्ज व्हावे. बूथ स्तरावरील संघटन हीच पक्षाची खरी शक्ती आहे, त्यामुळे बुथ मजबुतीकरणावर विशेष लक्ष द्यावे.”
डॉ. होळी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आदिवासी कल्याणाच्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः आदिवासी समाजातील युवक आणि महिलांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन भाजपाची विचारधारा गावागावात पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीला मंचावर भंडारा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मधुरा मदनकर, भाजपा जिल्हा महामंत्री कल्याणी निखाडे, नगर परिषद उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके, नियोजन समिती सदस्य जैकी रावलानी, शहराध्यक्ष सचिन कुंभलकर आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील भाजपा आदिवासी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



