गोंदियानागपूरविदर्भ

पिंडदान करताना तीन महिलांचा नदीत बुडून मृत्यू

बाघ नदीतील कोरणी घाटावरील घटना

गोंदिया : तालुक्यातील ग्रामपंचायत लईटोला जवळील पगारटोला येथील तुरकर कुटुंबीयांकडे पिंडदान करण्यासाठी आलेल्या तीन महिलांचा बाघ नदीतील कोरणी घाटात आंघोळ करत असताना पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना रविवार, ८ जून रोजी दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. मीनाक्षी संतोष बघेले (वय ३९), नीतू शत्रुधन बघेले (वय ३५), आणि मीराबाई इशुलाल तुरकर (वय ५०) – सर्व रा. नागपूर, अशी या घटनेतील मृत महिलांची नावे आहेत.

रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारटोला येथील मुकेश तुरकर यांचा ३० मे २०२५ रोजी मृत्यू झाला होता. त्यांचे पिंडदान करण्याकरिता तुरकर कुटुंबीय आणि त्यांचे जवळचे नातेवाईक रविवार, ८ जून रोजी दुपारी गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कोरणी घाटावर बाघ नदीत आले होते.

पिंडदानची संपूर्ण पूजा अर्चा संपल्यानंतर तुरकर कुटुंबीय बाघ नदीच्या नदीपात्रात आंघोळीकरिता उतरले. त्यावेळी नदीपात्रातील दगडावरून पाय घसरल्यामुळे नीतू शत्रुधन बघेले ही पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी मीनाक्षी संतोष बघेले धावली, परंतु तीदेखील बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी मीराबाई इशुलाल तुरकर यांनीही धाव घेतली असता, या तिघींचाही दुर्दैवाने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या महिला पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी आणखी एक महिला धावली होती, परंतु तिला त्यांच्याच एका नातेवाईकाने नदीपात्रात उडी घेऊन वाचविले. घटनेची माहिती तात्काळ रावणवाडी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, नदीपात्रात लोकांची मोठी गर्दी झाली होती. रावणवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि उपस्थित लोकांच्या मदतीने तिन्ही महिलांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणाची पोलीस स्टेशन रावणवाडी येथे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास रावणवाडीचे पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button