
‘सर्च’ आणि ‘मुक्तिपथ’च्या व्यसनमुक्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; समुपदेशन व औषधोपचाराने व्यसनमुक्तीचा मार्ग
गडचिरोली : दारूच्या विळख्यातून समाजाची सुटका करण्यासाठी ‘सर्च’ संस्था आणि ‘मुक्तिपथ’ यांच्या संयुक्त उपक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात गावपातळीवर व्यसनमुक्ती शिबिरे आयोजित केली जात आहेत. गाव संघटनेच्या मागणीनुसार विविध गावांमध्ये आयोजित या शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ५५ रुग्णांनी दारूमुक्त होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमामध्ये तज्ञ समुपदेशकांनी रुग्णांना मार्गदर्शन करत दारू सोडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
गडचिरोली तालुक्यातील टेंबा येथे ११, रानमूल येथे ९ रुग्ण, चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे १८ रुग्ण, धानोरा तालुक्यातील मोडेभट्टी येथे ७ आणि मुलचेरा तालुक्यातील मरपल्ली टोला येथे १० अशा एकूण ५५ रुग्णांनी या शिबिरांमध्ये उपचार घेतले. विविध गावांमध्ये आयोजित या एकदिवसीय व्यसन उपचार शिक्षण शिबिरांना ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये व्यसनमुक्तीसाठी आवश्यक औषधोपचार, वैयक्तिक समुपदेशन, तसेच गट सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी दारूच्या दुष्परिणामांवर सविस्तर प्रकाश टाकत व्यसनाचे धोक्याचे घटक समजावून सांगितले. तर दिक्षा तेल्कापल्लीवार यांनी प्रत्येक रुग्णाची केस हिस्ट्री घेऊन त्यांना योग्य औषधोपचार पद्धती समजावून सांगितल्या.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन तालुका मुक्तिपथ चमूने केले असून, पोलीस पाटील, सरपंच, आशा कार्यकर्ती आणि ग्रामस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले. ज्या गावात व्यसनाचे प्रमाण अधिक आहे आणि अशा उपक्रमाची गरज आहे, तेथील ग्रामस्थांनी ‘सर्च’ संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे, जेणेकरून अधिक लोकांना व्यसनमुक्त जीवनाचा लाभ घेता येईल.



