
ग्रामीण भागातील मानसिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ; टेलीमानस हेल्पलाइनची दिलीमाहिती
गोंदिया : आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जून रोजी गोंदिया येथील स्व. वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद येथे मानसिक आजारांबाबत एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
या प्रशिक्षण कार्यशाळेत उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने आणि भरारी पथक येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा मनोविकृती तज्ञ डॉ. लोकेश चिर्वतकर यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आजार, ताणतणाव, वर्तणूक उपचार, समुपदेशन, चिंतारोग, निद्रानाश, चिडचिडेपणा, दारू, तंबाखू, गुटखा, खर्रा यांसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम, तसेच डोळ्यांचे विकार, सांधेदुखी आणि कमरेचे आजार यांसारख्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत टेलीमानस १४४१६ या टोल फ्री क्रमांकाचे महत्त्व आणि त्याद्वारे मिळणाऱ्या सेवांबाबत सखोल जनजागृती करण्यात आली. हा टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध असून, उदासी, चिंता, घबराहट, मानसिक तणाव, आत्महत्येचे विचार, राग, चिडचिड इत्यादी समस्यांवर मोफत सल्ला व समुपदेशन मिळत असल्याचे सांगण्यात आले. सद्यस्थितीत बदललेल्या जीवनशैलीमुळे कर्मचारी व अधिकारी यांना रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड असे विविध आजार बळावत असल्याचे निरीक्षणही यावेळी नोंदवण्यात आले.
या कार्यशाळेला डॉ. अजय घोरमारे, डॉ. बी. डी. जयस्वाल, डॉ. अनिल आटे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमातील समुपदेशक अमिवा तगदे, मानसशास्त्रज्ञ दीपक अगुलवार, टिंकुश जाधव, केस रजिस्ट्री असिस्टंट हर्षीला साखरे आणि मनोविकृती आधिपरिचारिका आरजू रहांगडाले हे देखील उपस्थित होते. मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. लोकेश चिर्वतकर आणि मानसोपचार तज्ञ डॉ. अजित वागदे यांच्या टीमने या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वानखेडे यांच्या पुढाकाराने आयोजित ही एक दिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळा ग्रामीण भागातील लोकांना मानसिक आजारांबाबत आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने आणि मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण होण्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. लोकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे. नियमित योग किंवा व्यायाम, संतुलित आहार घेतल्यास प्रकृती उत्तम आणि निरोगी राहू शकते. कुठलेही व्यसन न बाळगता जीवनशैली बदलून मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अशा मानसिक आरोग्य कार्यशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
– डॉ. लोकेश चिर्वतकर, मानसिक आरोग्य तज्ञ



