गडचिरोलीविदर्भ

लाहेरी येथील आठवडी बाजारात भव्य आरोग्य शिबिर ; १०७ नागरिकांची मोफत तपासणी

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने जनसेवा आणि जनकल्याणाच्या भूमिकेतून अतिदुर्गम मानल्या जाणाऱ्या लाहेरी येथील आठवडी बाजारात रविवार, १२ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमात एकूण १०७ नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली असून, दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय, पोलीस रुग्णालय आणि सीआरपीएफ (CRPF) च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. डॉ. आशिष खुने (फिजीशियन), डॉ. प्रशांत आखाडे (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. गणेश चिचघरे, डॉ. श्रेया कुमरे आणि डॉ. दीप शेखर मोहन (सीआरपीएफ) यांनी रुग्णांची तपासणी केली. विशेषतः गरोदर माता आणि महिलांसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष उभारून त्यांना पोषण व आरोग्याबाबत मोफत मार्गदर्शन आणि औषधे देण्यात आली. १०७ पैकी ८ गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात संदर्भीत (Refer) करण्यात आले आहे.

केवळ आरोग्य सेवाच नव्हे, तर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि पोलीस दलाच्या कार्याबद्दल जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी बॅनर आणि प्रदर्शनी लावण्यात आली होती. यात शहीद जवानांचे बलिदान: देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. सी-६० शौर्यगाथा: नक्षलवादाचा मुकाबला करणाऱ्या सी-६० पथकाचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती देण्यात आली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गडचिरोली पोलीस, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ ९ व्या बटालियनने संयुक्तपणे काम केले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली लाहेरी उपपोस्टेचे प्रभारी अधिकारी पोउपनि गणेश इंगळे, ऋषिकेश कोरे आणि त्यांच्या चमूने विशेष परिश्रम घेतले. या आरोग्य शिबिरामुळे दुर्गम भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button