गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यात १५ जूनपासून ‘पीएम जनमन’ व ‘पीएम धरती आबा’ अभियानांतर्गत ‘संतृप्ती शिबिरे’

४११ आदिवासी गावांमध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळणार ; नागरिकांना सहभागाचे आवाहन

गडचिरोली : भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JUGA) अंतर्गत १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत संपूर्ण देशभरात विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमधील ४११ गावांमध्ये ‘संतृप्ती शिबिरां’चे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरांचे मुख्य उद्दिष्ट अनुसूचित जमातीच्या नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रभावीपणे पोहचविणे आणि या योजनांबाबत त्यांच्यात जनजागृती करणे हे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सशक्तीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या संतृप्ती शिबिरांमध्ये नागरिकांना नवीन आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, मतदार ओळखपत्र काढणे व अद्ययावत करणे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र मिळविणे, मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड व सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी रेशन कार्ड बनविणे, बँक खाती उघडणे, वैयक्तिक वनहक्क दावे स्वीकारणे, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान कार्ड आणि किसान क्रेडिट कार्ड तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज स्वीकारणे, वनधन विकास केंद्राशी संबंधित लाभ मिळवणे, सौर ऊर्जा व स्वयंपाक गॅस कनेक्शन मिळविणे, विमा योजनांची नोंदणी, सिकलसेल व ॲनेमिया तपासणी (आरोग्य विभागामार्फत) इत्यादी सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या महत्त्वपूर्ण अभियानाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button