गडचिरोलीविदर्भ

तालुक्यातील सर्व कार्यालये, शाळा तंबाखूमुक्त करा – तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांचे निर्देश

सर्व शासकीय कार्यालये, शाळा आणि गावांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम; अवैध दारूविक्री व निर्मितीवर कारवाईचा बडगा

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करावीत, तसेच शाळांमध्ये व्यापक जनजागृती करत तंबाखूच्या दुष्परिणामासंदर्भातील बॅनर प्रत्येक शाळेत लावून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश मुक्तिपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी दिले.

एटापल्ली तहसील कार्यालयात ‘दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम’ अंतर्गत मुक्तिपथ तालुकास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीला एटापल्ली मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार, ग्रामीण रुग्णालयाच्या एनसीडी समन्वयक शिल्पा बी. बुल्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास बेले, नगर पंचायतचे एल. टी. दुर्गे, बलवंत सुरजागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विभागनिहाय कारवाईचे निर्देश: यावेळी तहसीलदार गांगुर्डे यांनी तालुका पातळीवर पथक तयार करून प्रत्येक गावोगावी शाळांमध्ये व तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस आळा घालण्याचे निर्देश मुक्तिपथ तालुका संघटक आणि गटशिक्षणाधिकारी यांना दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व दारूमुक्त विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका समिती पुनर्गठीत करण्यात आली.

पोलीस विभागाला शहर व गाव पातळीवर असलेल्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करून दारू विक्री बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर दारू व तंबाखूमुक्तीकरिता समिती गठीत करण्यात आली असून, या समितीला कृतीशील होण्यास संवर्ग विकास अधिकारी यांनी पंचायत समिती येथे ग्रामसेवकांच्या मासिक सभेत तंबाखूजन्य पदार्थांपासून होणाऱ्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्रामस्तरीय अशा वर्कर्सना तंबाखूजन्य पदार्थांपासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देऊन कर्करोग नियंत्रणाकरिता मार्गदर्शन करावे, तसेच दारूचे व्यसन असलेल्या रुग्णांना मुक्तिपथ व्यसन उपचाराकरिता संदर्भित करण्यात यावे, असे सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांपैकी तंबाखूजन्य पदार्थ/ दारू व्यसन असणाऱ्या रुग्णांना नियमित समुपदेशन व पाठपुरावा करण्याकरिता तालुका क्लिनिकला संदर्भित करावे, असे निर्देश दिले. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांच्या परिक्षेत्रातील अवैध दारू सडवा नष्ट करून दारूभट्टी बंद करण्याकरिता कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा कार्यक्रमांतर्गत दारू व तंबाखूजन्य पदार्थांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असेही सूचित करण्यात आले. तसेच, गावातील गाव पाटील व भुमय्या पुजारी यांना प्रशिक्षण देऊन दारू व तंबाखूमुक्तीच्या कार्यक्रमांत सहभागी करून घेण्याचे आदेश तहसीलदार गांगुर्डे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले. या व्यापक मोहिमेमुळे एटापल्ली तालुक्याला व्यसनमुक्त करण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button