
एनडीए (NDA) व सीडीएस (CDS) परीक्षेत ‘कचलामी, जिडीवार आणि तुलावी‘ यांची बाजी; आता एसएसबी (SSB) मुलाखतीचे वेध
गडचिरोली : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम घेणाऱ्या गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या एन.डी.ए. (NDA) व सी.डी.एस. (CDS) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या तीन कॅडेट्सनी लेखी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
१२ एप्रिल २०२६ रोजी देशभरात पार पडलेल्या या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परीक्षेत विद्यालयाच्या कॅडेट मास्टर ऐश्वर्य कचलामी, कॅडेट मास्टर कौशिक जिडीवार, कॅडेट मास्टर स्मित तुलावी यांनी यश मिळविले आहे.
दरवर्षी सुमारे ७ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करतात. निगेटिव्ह मार्किंग आणि कडक शिस्त यामुळे ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. मात्र, गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या या तिन्ही उमेदवारांना आता पुढील टप्प्यात सेवा निवड मंडळाच्या (SSB) मुलाखत प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. ही प्रक्रिया तब्बल ५ दिवस चालते, ज्यामध्ये उमेदवारांची बुद्धिमत्ता, नेतृत्वगुण, मानसिक क्षमता आणि शारीरिक तंदुरुस्तीची कसून चाचणी घेतली जाते. यातूनच देशाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी भावी अधिकारी निवडले जातात.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव धर्मरावबाबा आत्राम, संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, सदस्य तनुश्री आत्राम आणि हर्षवर्धनराव आत्राम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे आणि सर्व शिक्षक वृंदाने यशस्वी कॅडेट्सवर कौतुकाचा वर्षाव करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे गडचिरोलीतील इतर विद्यार्थ्यांमध्येही देशसेवेसाठी सैन्यदलात अधिकारी म्हणून सामील होण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.



