गडचिरोलीविदर्भ

खा. डॉ. नामदेव किरसान यांनी घेतला नगर परिषदेच्या कामकाजाचा आढावा

शहर विकासासाठी कायमस्वरूपी पट्टे, शुद्ध पाणी आणि स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील विकासकामे आणि नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी नगर परिषद कार्यालयात बैठक घेतली. शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना कायमस्वरूपी पट्टे वितरित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यावर चर्चा झाली.

खासदार डॉ. किरसान यांनी शहरात स्वच्छता राखणे, नियमित नालीसफाई करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि मंजूर विकासकामांमध्ये गुणवत्ता राखणे या बाबींवर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत नागरिकांनी त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. खासदार डॉ. किरसान यांनी त्या सर्वांना गांभीर्याने घेत, संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत आणि प्रभावी निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, काँग्रेस शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष समशेरखाँ पठाण, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, सुनील डोंगरा, गुलाब मडावी यांच्यासह प्रभाकर वासेकर, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, रुपेश टिकले, सुरेश भांडेकर, संजय मेश्राम, रामकृष्ण ताजने, समीर ताजने, माजित सय्यद, गौरव येनप्रेड्डीवार, जावेद खान, कुणाल ताजने, लता मुरकुटे, कल्पना नंदेश्वर, रिता गोवर्धन आणि इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button