पाच लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या दुर्धर नऊ आजारांवरील उपचारासाठी रुग्णांना मिळणार निधी

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : आता राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च येणाऱ्या नऊ गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. विस्तारित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत, शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या निधीचा काही भाग राखीव ठेवला जाणार असून, या राखीव निधीतून दुर्मिळ आजारांवरील उपचारांचा खर्च उचलला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सध्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण दिले जाते. परंतु, या मर्यादेमुळे जास्त खर्च येणाऱ्या काही गंभीर शस्त्रक्रियांचा लाभ घेता येत नव्हता. नवीन निर्णयानुसार, या योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या निधीपैकी २० टक्के रक्कम राखीव निधी म्हणून वापरली जाणार आहे. या निधीतून नऊ दुर्मिळ आजारांवर उपचारासाठी मदत दिली जाईल.
यामध्ये हृदय प्रत्यारोपण: १५ लाख रुपये, फुफ्फुस प्रत्यारोपण: २० लाख रुपये, हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण: २० लाख रुपये, यकृत प्रत्यारोपण: २२ लाख रुपये, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अलोजेनिक): ९.५ लाख रुपये, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (अनरिलेटेड): १७ लाख रुपये, अस्थिमज्जा प्रत्यारोपण (हॅप्लो): १७ लाख रुपये, ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI): १० लाख रुपये, ट्रान्स कॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट (TMVR): १० लाख रुपये मिळणार.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीपैकी उर्वरित ८० टक्के रक्कम संबंधित रुग्णालयांना देण्यात येईल. या निधीचा वापर रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. यात रुग्णालयांना पायाभूत सुविधांसाठी १९ टक्के, औषध आणि सामग्रीसाठी ४० टक्के आणि कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. तसेच, प्रसिद्धी व माहितीसाठी १ टक्का निधी वापरता येणार आहे. या निर्णयामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांचेही मनोधैर्य वाढेल.
या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आणि निधीच्या योग्य विनियोगासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.



