गडचिरोलीविदर्भ

कोंदावाही येथे ‘धरती आबा जनजाती उत्कर्ष योजना’ व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप ; सरपंच संजय गावडे यांनी गोंडी भाषेत केले मार्गदर्शन

धानोरा : तालुक्यातील कोंदावाही येथे तहसील कार्यालय धानोरा आणि मंडळ अधिकारी, कारवाफा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२५ अंतर्गत ‘धरती आबा जनजाती उत्कर्ष योजना अभियान’ आणि ‘समाधान शिबिर’ यशस्वीरित्या घेण्यात आले. या शिबिरात कोंदावाही आणि गोडलवाही परिसरातील शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कामनगडचे सरपंच संजय गावडे यांनी गोंडी भाषेत उपस्थित शेतकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात कागदपत्रांची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या कुटुंबातील नवीन सदस्यांच्या जन्मापासून ते मयत व्यक्तीच्या मृत्यूच्या नोंदीपर्यंतची सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. अनेकदा नागरिक योजनांसाठी धावपळ करतात, परंतु पुराव्यांअभावी त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे वेळेच्या वेळी संबंधित विभागाकडून ती कागदपत्रे काढून घ्यावीत, जेणेकरून शासनाच्या विविध प्रकारच्या कामात मदत होते. या समाधान शिबिरात विविध विकासाच्या योजना विविध विभागांकडून राबविल्या जात असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच ग्रामपंचायत अरविंद वेडदा होते. यावेळी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी श्री. अशोक ठाकरे, कृषी पर्यवेक्षक संतोष चलाख, कृषी सहाय्यक राकेश कोटनाके, निमतांदार भूमी अभिलेख श्री. शिशुपालजी शेंद्रे, ग्रामसभा अध्यक्ष देवाजी पदा, मंडळ अधिकारी कुळमेथे मॅडम तसेच आदी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कृषी विस्तार अधिकारी अशोक ठाकरे यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत सिंचन विहीर, विंधन विहीर, जाळीचे तार, ताडपत्री इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले. संतोषजी चलाख यांनी तालुका कृषी अंतर्गत ट्रॅक्टर योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा, पीक विमा योजना, पाईप पोखर अंतर्गत आराखडे कसे तयार केले जातात, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, महाडीबीटी अंतर्गत फार्मर आयडी, आधार कार्ड, स्वतःचे बँक पासबुक, सातबारा इत्यादी कागदपत्रांबाबत माहिती दिली. शिशुपालजी शेंद्रे यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलेल्या गावांचे आखीव पत्रिकांचे वाटप केले.

सदर शिबिरात फार्मर आयडी, उत्पन्नाचे दाखले, जन्म-मृत्यू दाखले वाटप करण्यात आले. शिबिराचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी कुळमेथे यांनी केले तर आभार तलाठी आत्राम यांनी मानले. या शिबिरामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रे मिळवण्याची सोय उपलब्ध झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button