
गोंदिया : दरवर्षी १४ जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक रक्तदाता दिनाचे महत्त्व आणि रक्ताची गरज गावपातळीवर पोहोचवण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरंबीटोला अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, वडेगाव/स्टेशन येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील लोकांना एकत्र करून रक्ताचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यासाठी वडेगाव/स्टेशनचे सरपंच श्रीकांत लोणारे यांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली.
आयुष्मान आरोग्य मंदिर, वडेगाव/स्टेशन येथील आरोग्य संस्थेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निखिल लंजे यांनी उपस्थितांना सुरक्षित रक्ताची गरज आणि रक्ताचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यांनी लोकांना रक्तदान करण्यासाठी मार्गदर्शन करून जनजागृती केली.
डॉ. लंजे यांनी सध्याच्या परिस्थितीत लोकांमध्ये वाढलेल्या अशक्तपणावर चिंता व्यक्त केली. अन्नाचा अभाव आणि संतुलित आहाराच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणाचा सामना करावा लागतो, तसेच काही वैद्यकीय परिस्थितीमुळेही रक्ताची आवश्यकता भासू शकते, असे त्यांनी सांगितले. सिकलसेल, थॅलेसेमिया, गर्भधारणा, अपघात आणि इतर अनेक वैद्यकीय प्रकरणांमध्ये रुग्णांना रक्ताची निकड असते. मात्र, बऱ्याचदा रुग्णालयात पुरेसे रक्त उपलब्ध नसल्याने कुटुंबातील सदस्यांकडून किंवा रक्तपेढीतून रक्त घ्यावे लागते, असे ते म्हणाले. अशा वेळी नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवून पुढे येऊन रक्तदान करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. लंजे यांनी केले.
आरोग्य सेविका पायल बनकर यांनी समुदायाला माहिती दिली की, रक्तदान करणे ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. बरेच लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा रक्तपेढीला रक्तदान करतात, जेणेकरून गरजूंना वेळेवर रक्त मिळू शकेल. वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. म्हणूनच, प्रत्येकाने रक्तदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले आहे. रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त तयार होते आणि रक्त शुद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.
या जागतिक रक्तदाता दिन समुपदेशन जनजागृती कार्यक्रमात सरपंच श्रीकांत लोणारे, सामाजिक कार्यकर्ते प्रशिक टेंभुर्णे, उपकेंद्र वडेगाव/स्टेशनचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निखिल लंजे, आरोग्य सेविका पायल बनकर, आशा सेविका सुष्मा बडोले आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात रक्तदानाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल अशी आशा आहे.



