
गडचिरोली : चामोर्शी येथील चामोर्शी, नगर भूमापन क्र. ८७६ मधील जागेवरून धनराज वासेकर आणि जय किसान दंडार मंडळ, गव्हारपुरा यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मंडळाने आपल्या जागेवर अतिक्रमण करून ये-जा करण्याचा मार्ग बंद केल्याचा आरोप धनराज वासेकर आणि त्यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेतून केला आहे. यामुळे त्यांना मानसिक त्रास होत असून, लवकरच उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
धनराज वासेकर यांच्या म्हणण्यानुसार, गेली अनेक वर्षांपासून नगर भूमापन क्र. ८७६ मधील एकूण ९०.६० चौ. मीटर जागेवर त्यांच्या कुटुंबाची वहिवाट आहे. त्यांचे मोठे वडील नारायण बुधा वासेकर यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी या जागेपैकी १४४ चौ. फूट जागा मंदिरासह जय किसान दंडार मंडळ, गव्हारपुरा, पार्टी नं. १ च्या ५१ सभासदांना सामाजिक कार्यासाठी दानपत्र म्हणून दिली होती. उर्वरित जागा त्यांनी स्वतःची भाची सौ. सुमन शंकर भांडेकर, रा. भोगणबोडी ३६ यांना विक्रीपत्र करून दिली होती.
धनराज वासेकर यांनी २०२५ मध्ये सौ. सुमन शंकर भांडेकर यांच्याकडून ही उर्वरित जागा खरेदी केली. मात्र, वासेकर यांच्या म्हणण्यानुसार, दान दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेवर जय किसान दंडार मंडळ गव्हारपुरा, पार्टी नं. १ च्या ५१ सभासदांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, रात्री ११ वाजता नशापाणी करून, बळजबरीने जाळीचे कंपाउंड केले. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नाहक त्रास देण्यासाठी जाणूनबुजून ये-जा करण्याचा मार्ग बंद केल्याचा आरोप वासेकर यांनी केला आहे.
यापूर्वी सामाजिक दायित्व जपून नगरपंचायत चामोर्शीकडून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून सदर मंदिराच्या परिसरात हँडपंप (बोरवेल) मारून दिला आहे, असे धनराज वासेकर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी गडचिरोली विधानसभा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीसुद्धा भेट देऊन जय किसान दंडार मंडळाच्या सभासदांना वालकंपाउंड करू नका असे सांगितले होते. तरीही त्यांच्या सूचनांचे पालन न करता जाळीचे वालकंपाउंड केल्याचे वासेकर यांनी म्हटले आहे.
या सर्व प्रकरणामुळे धनराज वासेकर आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असून, या मंडळामुळे त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. असे काही घडल्यास जय किसान दंडार मंडळ गव्हारपुराचे सर्व सभासद जबाबदार असतील, असेही त्यांनी म्हटले आहे. संबंधित प्रशासनाने न्याय द्यावा, अन्यथा येत्या काही दिवसांत कुटुंबासह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा धनराज वासेकर आणि त्यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेतून दिला आहे.
याबाबत मंडळाचे पदाधिकारी माणिकचंद कोहळे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, “आमच्या मंडळातील सदस्यांनी कुणाच्याही जागेवर अतिक्रमण केलेले नाही. जी जागा आम्हाला देण्यात आली आहे, त्याच जागेवर आमची वहिवाट असून कंपाउंड करण्याच्या दृष्टीने जाळी लावण्यात आली आहे. जर त्यांना वाटत असल्यास त्यांनी मोजणी करून घेऊन जावे. यात आमची कसलीही तक्रार राहणार नाही. त्यामुळे आमच्या मंडळांवर करण्यात आलेले आरोप चुकीचे व बिनबुडाचे असून राजकीय बदनामी करणारे आहेत.”
या वादासंदर्भात स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



