
गणेशपूर येथील घटना ; पोटविकाराने होते त्रस्त
आरमोरी : पोटविकाराच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या एका इसमाने आपल्या दोन मुलींच्या समक्ष सासरवाडीच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, १९ जून रोजी सकाळी ८:३० वाजता गणेशपूर येथे घडली. या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गोविंदा निरंगशहा अलाम (४५), रा. नरचुली, हल्ली मुक्काम गणेशपूर-२, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. गोविंदा अलाम मूळचे नरचुली येथील होते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून ते गणेशपूर-२ येथे पत्नी आणि दोन मुलींसोबत सासरवाडीत राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा यांना दारूचे व्यसन होते आणि ते खूपच दारूच्या आहारी गेले होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांना उलट्यांचा त्रास होत होता, ज्यामुळे ते खूपच त्रस्त होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी गोविंदा यांनी पत्नीला शेतात जात असल्याचे सांगून घर सोडले. त्यांची १४ आणि १६ वर्षांच्या दोन्ही मुली आधीच तुरी रोवण्यासाठी शेतात आल्या होत्या. गोविंदा शेतात पोहोचल्यावर, त्यांनी अचानक विहिरीत उडी घेतली. ही बाब दोन्ही मुलींच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली, परंतु आसपास कुणीही नव्हते. अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच गोविंदा विहिरीच्या तळाला गेले आणि ते बाहेर आले नाहीत. मुलींनी तातडीने आपली आई प्रभा अलाम यांना ही माहिती दिली. प्रभा अलाम तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु तोपर्यंत गोविंदा यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर मेश्राम करत आहेत.



