
उपवनसंरक्षक टोलिया यांनी वनरक्षक व वनपालास केले निलंबित
आलापल्ली: वनसुरक्षेबाबत गंभीर दिरंगाई, वरिष्ठांना चुकीची माहिती सादर करणे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया यांनी दोन वनकर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित झालेल्यांमध्ये गोमणीचे वनपाल एन.टी. सिडाम आणि मुकडी टोला-१ चे वनरक्षक सचिन मस्के यांचा समावेश आहे.
या संदर्भात शंकर ढोलगे यांनी मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार केली होती. त्यांच्या आदेशानुसार, विभागीय वनअधिकारी (दक्षता) यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत, दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात अक्षम्य दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी आपल्या वनक्षेत्रात प्रत्यक्ष कर्तव्य निभावण्याऐवजी केवळ कागदोपत्री जबाबदारी पूर्ण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
निलंबनाच्या आदेशानुसार, वनपाल एन.टी. सिडाम यांचे मुख्यालय आलापल्ली तर वनरक्षक सचिन मस्के यांचे मुख्यालय पेरमिली येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.



