गडचिरोलीविदर्भ

माजी आ. गजबे यांच्या हस्ते आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत सुसज्ज सभागृह, ग्रंथालय व व्यायामशाळा उभारणीला सुरुवात 

देसाईगंज : नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्थानिक आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (PM-USHA) मंजूर झालेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन काल, गुरुवारी (१९ जून) आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश शर्मा, सचिव मोतीलाल कुकरेजा, सहसचिव ओमप्रकाश अग्रवाल, माजी प्राचार्य तथा संस्था सदस्य डॉ. शंकर कुकरेजा, कोषाध्यक्ष योगेश नागतोडे, संस्था सदस्य संतूमल डोडानी, जहीरभाई शेख, डॉ. इंदरप्रित सिंह टूटेजा, प्रमोद चिलवे, नानक कुकरेजा, सौ. साधनाताई सपाटे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. श्रीराम गहाणे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दामोदर शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. भूमिपूजनाचा समारंभ भारतीय संस्कृतीच्या विधीनुसार पार पडला.

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत महाविद्यालयाला मिळालेले नवीन इमारत बांधकामाचे अनुदान महाविद्यालयाच्या विकासात महत्त्वाचे ठरणार आहे. या अनुदानातून महाविद्यालय परिसरात नवीन सुसज्ज सभागृह, ग्रंथालय आणि व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात येणार आहे. या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि सर्व सुविधायुक्त उच्च शिक्षण मिळेल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.

या भूमिपूजन समारंभाला आदर्श महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच आदर्श इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button